Deepinder Goyal Temple Device : फूड डिलिव्हरी क्षेत्रातील अग्रगन्य कंपनी ‘झोमॅटो’चे (आताची इटर्नल लिमिटेड) सह-संस्थापक आणि माजी सीईओ दीपंदर गोयल हे आता एका नव्या प्रॉडक्टवर काम करत आहे. झोमॅटोच्या अभूतपूर्व यशानंतर, ४३ वर्षीय अब्जाधीश उद्योजक दीपंदर गोयल यांनी आपला मोर्चा आता ‘हेल्थटेक’ आणि ‘एरोस्पेस’ या क्षेत्रांकडे वळवला आहे. गोयल यांनी त्यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि महागड्या ‘टेंपल’ या वेअरेबल डिव्हाईसची घोषणा केली आहे. तसेच भारतातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एका एरोस्पेस स्टार्टअपमध्ये वैयक्तिक गुंतवणूक केली आहे.
काय आहे ‘टेंपल’ डिव्हाईस?
‘ब्लूमबर्ग’ला दिलेल्या मुलाखतीत गोयल यांनी सांगितले, हे नवीन उत्पादन सर्वसामान्य ग्राहकांसाठी नाही. हे प्रामुख्याने खेळाडू, बडे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह आणि स्टार्टअप्सचे संस्थापक यांच्यासाठी डिझाइन केले आहे. या डिव्हाईसचा आकार काजूच्या बी सारखा असून ते कपाळाच्या बाजूला लावले जाईल, म्हणूनच याचे नाव ‘टेंपल’ ठेवण्यात आले आहे. या डिव्हाईसची किंमत सुमारे १,००० डॉलर म्हणजे अंदाजे ८४,००० रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. गोयल म्हणाले सध्याचे स्मार्टवॉच किंवा फिटनेस रिंग्ज केवळ हृदयाचे ठोके मोजतात, जे शरीराच्या स्थितीचा केवळ एक अंदाज असतो. जे अनेकदा चुकीचे असू शकतात. परंतु, ‘टेंपल’ थेट शरीराचा ‘मेटाबॉलिक रेट’ रिअल टाइममध्ये मोजेल.
मेंदूतील रक्तप्रवाहाचा अभ्यास करत असताना गोयल यांच्या टीमला ‘एन्ट्रॉपी’ नावाचा एक नवीन बायोमार्कर सापडला. हा बायोमार्कर थेट चयापचय दराशी संबंधित असून याद्वारे व्यक्तीचा ताण, ध्यान, रिकव्हरी, झोप आणि व्यायामाची अचूक माहिती मिळते.
‘टेंपल’ सर्वांसाठी नाही तर स्वतःसाठी बनवतोय : दीपंदर गोयल
या नवीन डिव्हाईसविषयी बोलताना गोयल म्हणाले, की “मी ‘टेंपल’ सर्वांसाठी बनवत नाहीये. खरं तर, मी ते स्वतःसाठी बनवत आहे. आम्ही जे काही स्वतःसाठी करत आहोत, त्याचा ‘बिझनेस’ हा केवळ एक बाय-प्रॉडक्ट आहे. पुढील ६ महिने ते १ वर्षात आम्ही हे वेलनेस डिव्हाईस म्हणून बाजारात आणू.”
या उपकरणाला अजून वैद्यकीय नियामक मंजुरी मिळालेली नसून या विज्ञानाची स्वतंत्र शास्त्रज्ञांकडून पडताळणी होणे बाकी आहे
भारतीय शहरांमधील कोंडी फोडण्यासाठी ‘एरोस्पेस’मध्ये १६५ कोटींची गुंतवणूक
हेल्थटेक व्यतिरिक्त, गोयल यांनी ‘लॅट एरोस्पेस’ या विमान वाहतूक क्षेत्रातील स्टार्टअपमध्ये सुमारे १६७ कोटी रुपयांची वैयक्तिक गुंतवणूक केली आहे. भारतातील मोठ्या शहरांमधील ट्रॅफिक आणि विमानतळांवरील गर्दी कमी करण्यासाठी हे स्टार्टअप अतिशय कमी खर्चात चालणारी, लहान धावपट्टीवरून उड्डाण आणि लँडिंग करू शकणारी ८-आसनी विमाने विकसित करत आहे. या विमानांच्या नेटवर्कद्वारे प्रवासी मुख्य विमानतळांवर न जाता थेट लहान शहरे, गावे आणि व्यावसायिक केंद्रांमध्ये प्रवास करू शकतील. “हा अत्यंत कठीण प्रकल्प आहे. हा यशस्वी होईल याची मला केवळ ०.१% च अपेक्षा आहे, कारण यात इंजिनिअरिंग, सरकारी नियम आणि पायाभूत सुविधांची मोठी आव्हाने आहेत,” असं दीपंदर गोयल म्हणाले.
