Disney Mass Layoffs 20 Percent Cost Cut : मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रातील जागतिक कंपनी ‘द वॉल्ट डिस्ने’ पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देणार आहे. वाढता खर्च नियंत्रित करण्यासाठी कंपनीने विविध विभागांच्या व्यवस्थापकांना वार्षिक खर्चात तब्बल २० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचे टार्गेट दिले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही डिस्ने कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले होते.
ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसारडिस्नेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉश डी’अमारो यांच्यासमोर सध्या अनेक मोठी आव्हाने उभी आहेत. एआयचा वाढता वापर, बॉक्स ऑफिसवरील कमी झालेली कमाई, ओटीटी/स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवरील स्पर्धा आणि परदेशातील थीम पार्कला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत झालेली घट यामुळे कंपनीच्या महसुलावर ताण आला आहे.
बचत केलेला निधी कुठे वापरणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतील काही विभागांना इतर विभागांच्या तुलनेत अधिक कर्मचारी कपातीचा सामना करावा लागू शकतो. या कपातीतून वाचणारा निधी कंपनीचे चित्रपट, टीव्ही प्रोग्रामिंग, नवीन तंत्रज्ञान, थीम पार्क आणि क्रूझ शिप ऑपरेशन्स या प्रमुख क्षेत्रांच्या विकासासाठी खर्च करण्याचा कंपनीचा विचार आहे. सध्या नक्की किती कर्मचाऱ्यांना याचा फटका बसेल हे स्पष्ट झालेले नाही. मात्र २०२५ च्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत डिज्नीकडे जागतिक स्तरावर सुमारे २,३१,००० कर्मचारी कार्यरत होते.
चालू वर्षात कपातीचे सत्र
डिस्नेसाठी हे वर्ष कर्मचारी कपातीचेच ठरले आहे. गेल्या आठवड्यातच कंपनीने आपल्या थीम पार्क विभागातील सुमारे १०० ते २०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. ही शाखा थीम पार्क, रिसॉर्ट्स, क्रूझ आणि लाइव्ह मनोरंजन कार्यक्रमांचे तांत्रिक आणि क्रिएटीव्ह काम पाहत होती. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात कंपनीने खर्च कमी करण्यासाठी ‘ऐच्छिक लवकर निवृत्ती’ ही योजना लागू केली होती. दरम्यान, या संभाव्य कर्मचारी कपातीच्या वृत्तावर ‘द वॉल्ट डिस्ने’ कंपनीकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
एआयमुळे अनेक क्षेत्रात कर्मचारी कपात
एआयमुळे केवळ तंत्रज्ञान, मीडिया किंवा मनोरंजन क्षेत्रच नाही तर इतरही अनेक क्षेत्रात याचा परिणाम पाहायला मिळत आहे. एआयच्या स्पर्धेत पुढे राहण्यासाठी जागतिक कंपन्या अब्जावधी डॉलर्स तंत्रज्ञानावर खर्च करत आहेत. परिणामी निधीची कमतरता भरुन काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कपात केली जात आहे.
