DoorDash India entry job openings Hyderabad : गेल्या वर्षभरापासून आयटीसह अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात पाहायला मिळाली. अशा वातावरणात आता एक चांगली बातमी समोर आली आहे. जगातील आघाडीची लोकल कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ‘डोरडॅश’ कंपनीने अखेर भारताच्या बाजारपेठेत पाऊल ठेवलं आहे. हैदराबाद येथे कंपनीच्या पहिल्या भारतीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला ५०० कर्मचाऱ्यांच्या टीमसह कामकाज सुरू करणारी कंपनी आगामी २ वर्षांत ३ हजारांहून अधिक तरुणांना रोजगार देणार आहे.

‘डोरडॅश’चे तिसरे जागतिक सीएक्सआय सेंटर भारतात

अमेरिकेतील अ‍ॅरिझोना आणि मेक्सिको सिटीनंतरचे हे ‘डोरडॅश’चे तिसरे जागतिक सीएक्सआय सर्व्हिस सेंटर ठरले आहे. हे केंद्र जगभरातील ५ कोटी ६० लाख मासिक युजर्सना आणि ४० हून अधिक देशांमधील ग्राहकांना सेवा पुरवणार आहे. यामध्ये कस्टमर एक्सपिरियन्स अँड इंटीग्रिटी आणि प्रशासन आणि व्यवस्थापन असे दोन विभाग असणार आहेत.

झोमॅटो आणि स्विंगीसाठी नवी स्पर्धा?

सध्या देशात फूड आणि किराणा डिलिव्हरी करण्यात ‘झोमॅटो’ आणि ‘स्विंगी’ कंपन्या आघाडीवर आहेत. मात्र, आगामी काळात त्यांना ‘डोरडॅश’चे तगडे आव्हान मिळणार आहे. भारतात ज्याप्रमाणे झोमॅटो आणि स्विंगी या कंपन्या रेस्टॉरंट्स आणि ऑनलाइन ग्राहकांना जोडण्याचे काम करतात, तसेच ‘डोरडॅश’ अमेरिकेत काम करते. २०१३ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांनी या कंपनीची स्थापन केली. आता ‘डोरडॅश’ लॉजिस्टिक्स, सबस्क्रिप्शन मॉडेल्स आणि जलद किराणा माल डिलिव्हरीमध्येही काम करत आहे. भारतीय कंपन्यांनी हेच मॉडेल भारतात वापरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या ‘डोरडॅश’ प्रामुख्याने उत्तर अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड आणि युरोपमध्ये सेवा पुरवते.

‘जलद सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट’

यावेळी बोलताना कंपनीने सह-संस्थापक म्हणाले, की “आम्ही स्वतःकडे एक लॉजिस्टिक्स कंपनी म्हणून पाहतो. बाजारातील इतर कोणत्याही सेवेपेक्षा जलद सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे,”

हैदराबाद शहराची जागतिक विश्वासार्हता

मंत्री डी. श्रीधर बाबू यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “डोरडॅशचा हा निर्णय हैदराबाद शहराची जागतिक स्तरावरील पत आणि विश्वासार्हता पुन्हा एकदा सिद्ध करतो. जागतिक दर्जाच्या डिजिटल कंपन्या हैदराबादमधून आपला कारभार कशा चालवू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.”