Elon Musk Grok AI Ban Indonesia: एलॉन मस्क यांच्या मालकीच्या xAI च्या ग्रोक चॅटबॉटद्वारे युजर्स मोठ्या प्रमाणात अश्लील छायाचित्रे निर्माण करत असल्यामुळे जगभरात चिंता निर्माण झाली आहे. यानंतर इंडोनेशिया xAI च्या ग्रोक चॅटबॉटवर बंदी घालणारा पहिला देश ठरला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी अश्लील कंटेंट निर्मितीशी संबंधित धोके ओळखल्यानंतर हे पाऊल उचलले आहे.
इंडोनेशियाच्या दळणवळण आणि डिजिटल व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की, या टूलमध्ये संमतीशिवाय लैंगिक डीपफेक कंटेंट तयार होण्यापासून रोखण्यासाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा नाही. सरकारच्या मते, हे मानवाधिकार आणि डिजिटल सुरक्षेचे उल्लंघन आहे.
ग्रोकच्या कंटेंट निर्मितीबाबत युरोप आणि आशियातील काही देशांनी चौकशी सुरू केल्यानंतर इंडोनेशियाने हे पाऊल उचलले आहे. अलीकडील वृत्तांनुसार, या चॅटबॉटचा वापर अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या लैंगिक स्वरूपाच्या छायाचित्रांची निर्मिती करण्यासाठी केला जात होता. यानंतर ग्रोकची विकसक कंपनी xAI ने जाहीर केले आहे की, ते आपले सुरक्षा फिल्टर अधिक कठोर करत असून छायाचित्र निर्मिती व एडिटिंगची वैशिष्ट्ये केवळ सशुल्क सदस्यांसाठी मर्यादित करणार आहेत.
ग्रोक चॅटबॉटवर तात्पुरती बंदी घातल्याबाबत इंडोनेशियाचे स्पष्टीकरण
रॉयटर्सला दिलेल्या निवेदनात इंडोनेशियाच्या दळणवळण आणि डिजिटल मंत्री म्युत्या हाफिद म्हणाल्या, “संमतीशिवाय तयार करण्यात येणारी लैंगिक डीपफेक छायाचित्रे ही मानवाधिकार, मानवी प्रतिष्ठा आणि डिजिटल जगातील नागरिकांच्या सुरक्षेचे गंभीर उल्लंघन आहेत.”
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयाने एक्स (पूर्वीचे ट्विटर) च्या अधिकाऱ्यांनाही बोलावले आहे. इंडोनेशियामध्ये अश्लील मानल्या जाणाऱ्या कंटेंटच्या ऑनलाइन शेअरिंगवर कठोर निर्बंध आहेत.
या आठवड्याच्या सुरुवातीला एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट एक्सवर सांगितले होते की, ग्रोकचा वापर करून बेकायदेशीर कंटेंट तयार करणाऱ्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. ग्रोकच्या गैरवापरामुळे मस्क यांना ब्रिटनमध्ये दंड, कायदेशीर कारवाई आणि एक्सवर संभाव्य बंदीच्या इशाऱ्यांना सामोरे जावे लागले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची टीका
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही शोषक लैंगिक कंटेंट निर्मितीसाठी ग्रोक चॅटबॉटच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यासह इतर आंतरराष्ट्रीय नेत्यांसोबत एक्सवर या विषयावर टीका केली होती.
