Ex Google Engineer Nate Soares AI Human Extinction Warning: गुगलचे माजी इंजीनिअर आणि एआय सुरक्षा क्षेत्रातील एक प्रमुख संशोधक नेट सोआरेस यांनी आपल्या निवृत्तीवेतन बचतीमध्ये योगदान देणे थांबवले आहे. याचे कारण असे की, त्यांच्या मते पुढील दशकात एआयमुळे मानवजात नष्ट होण्याची शक्यता अधिक आहे.
मशिन इंटेलिजन्स रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नेट सोआरेस यांनी यांनी ‘द मोस्ट इंटरेस्टिंग थिंग इन एआय’ या पॉडकास्टमध्ये ही मते मांडली आहेत. सोअर्स यांच्या मते, जर पुरेशा सुरक्षा उपायांशिवाय शक्तिशाली एआय प्रणाली विकसित केल्या गेल्या, तर पुढील १० वर्षांत मानवजात नष्ट होण्याची शक्यता ५० टक्क्यांहून अधिक आहे.
आपल्याकडे दहा वर्षेही उरलेली नाहीत
“मला तर असे वाटते की, आपल्याकडे आता दहा वर्षांचा कालावधीही उरलेला नाही,” असे सोआर्स यांनी, ‘येत्या १० वर्षांत मानवजात अस्तित्वात नसेल का?’ या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले.
त्यांचा इशारा आजच्या चॅटबॉट्स किंवा इमेज जनरेटर्सविषयी नसून, भविष्यातील अशा ‘सुपरइंटेलिजंट’ प्रणालींविषयी आहे ज्या मानवी बुद्धिमत्तेच्या सर्वच संज्ञानात्मक क्षेत्रांत मानवापेक्षा अधिक सक्षम असतील. सोआर्स यांच्या मते, अशा प्रणाली कदाचित अशी उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न करतील जी मानवी मूल्यांशी सुसंगत नसतील. ज्यामुळे विनाशकारी आणि कदाचित कधीही न भरून निघणारे परिणाम घडू शकतात.
निवृत्तीसाठीची बचत बंद
सोआरेस यांच्या वैयक्तिक आर्थिक निर्णयांनी सर्वांचेच विशेष लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी सांगितले की, गुगलमध्ये काम करत असताना सुरू केलेले त्यांचे ‘४०१(के)’ निवृत्ती खाते अजूनही अस्तित्वात आहे, परंतु गेल्या सुमारे दशकापासून त्यांनी त्यात कोणतीही नवीन रक्कम जमा केलेली नाही.
“मी सध्या निवृत्तीसाठी बचत करत नाही. माझ्याकडे गुगलमधील कार्यकाळातील एक ‘४०१(के)’ खाते आहे, पण गेल्या दहा वर्षांपासून मी त्यात कोणतीही भर घातलेली नाही”, असे ते म्हणाले.
यातून हे दिसते की, ते स्वतःच्या जोखमीच्या मूल्यांकनाकडे किती गांभीर्याने पाहतात. सोआरेस यांनी २०१४ मध्ये गुगल सोडले आणि मशिन इंटेलिजन्स रिसर्च इन्स्टिट्यूट या ना-नफा संस्थेत काम सुरू केले. ही संस्था एआय अलाइनमेंट म्हणजेच ‘प्रगत एआय प्रणाली मानवी हेतूंनुसार विश्वासार्हपणे काम करतील याची खात्री करण्याचे आव्हान’ या विषयावर काम करते.
एआय कंपन्यांची स्पर्धा
सोआरेस यांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे जेव्हा तंत्रज्ञान कंपन्या अधिक सक्षम एआय मॉडेल्स विकसित करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत. यामुळे नवीन प्रणाली अधिक वेगाने बाजारात आणण्यासाठीची स्पर्धा तीव्र झाली आहे. त्यांच्या मते या स्पर्धेमुळे अशा प्रणाली निर्माण होण्याचा धोका वाढतो, ज्यांचे वर्तन पूर्णपणे नियंत्रित करणे किंवा समजून घेणे शक्य नसते.
