AI Impact on Indian IT Jobs: एआयमध्ये वेगाने होत असलेल्या प्रगतीचा भारताच्या कुशल कर्मचारी वर्गाच्या रोजगारावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताचे ‘आयटी सेवा-आधारित’ विकासाचे प्रारूप बदलू शकते, असे अर्न्स्ट अँड यंग (EY) या सल्लागार संस्थेने आपल्या ‘इकॉनॉमी वॉच’ अहवालाच्या मे २०२६ च्या आवृत्तीत म्हटले आहे. या अहवालात AI मुळे उत्पादकतेत होणारी संभाव्य वाढ, तसेच कामगारांनी वेगाने नवीन कौशल्ये आत्मसात न केल्यास त्यांच्या नोकऱ्यांना निर्माण होणारा धोका, या दोन्ही गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
अर्न्स्ट अँड यंगने म्हटले आहे की, जनरेटिव्ह AI आणि ऑटोमेशन टूल्सच्या वेगाने होत असलेल्या विकासामुळे जागतिक स्तरावरील रोजगाराचे स्वरूप बदलण्याची अपेक्षा आहे. याचे भारतावर विशेष परिणाम होतील, कारण भारताच्या सेवा क्षेत्रातील निर्यातीमध्ये माहिती तंत्रज्ञान (IT) आणि व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन (BPM) या क्षेत्रांचे वर्चस्व आहे.
आयटी क्षेत्रावर एआयचा काय परिणाम होणार?
“AI च्या या वेगाने होत असलेल्या विकासामुळे भारतातील कुशल कामगार वर्गाच्या रोजगारावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्या कुशल कामगारांना आतापर्यंत आयटी सेवांशी संबंधित असलेल्या, आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर अशा रोजगार बाजारपेठेत नोकरीच्या संधी उपलब्ध होत होत्या”, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सल्लागार संस्था अर्न्स्ट अँड यंगने अहवालात नमूद केले की, जगभरातील कंपन्या उत्पादकता सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी एआयचा अवलंब करत आहेत. या बदलामुळे नवीन संधी निर्माण होत असल्या तरी, काही विशिष्ट व्हाईट-कॉलर पदे संपुष्टात येऊ शकतात. अर्न्स्ट अँड यंगने एआयचे वर्णन नवोन्मेषाचे (इन्होवेशन) इंजिन आणि विघटनाचा स्रोत असे केले आहे. यामुळे कार्यक्षमता आणि उच्च-मूल्यवान सेवांना चालना मिळू शकते, पण त्याचबरोबर ‘आयटी’सारख्या सेवांच्या निर्यातीचा मुख्य आधार असलेल्या नियमित कामांची मागणीही कमी होऊ शकते.
एआय युगात कौशल्ये ठरणार महत्त्वाची
अर्न्स्ट अँड यंगने असा इशारा दिला आहे की, जर कर्मचारी बदलत्या कौशल्यांच्या गरजांशी जुळवून घेऊ शकले नाहीत, तर तांत्रिक बदलांमुळे निर्माण होणारे धोके मोठे असतील. अहवालामध्ये सरकार व कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पुनर्कौशल्य आणि कौशल्यवृद्धी कार्यक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
अहवालात म्हटले आहे की, “जर कामगार बदलत्या कौशल्यांच्या गरजांशी लवकर जुळवून घेऊ शकले नाहीत, तर तांत्रिक बदलांमुळे रोजगाराला जे संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात ते आर्थिक नियोजनात विचारात घेतले पाहिजेत. तसेच, या घडामोडींचा भारताच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन विकास कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.”
भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल
रोजगाराशी संबंधित जोखीम असूनही, अर्न्स्ट अँड यंगने भारताच्या दीर्घकालीन विकासाच्या वाटचालीबाबत आशावादी मत मांडले आहे. ‘आर्थिक सहकार्य आणि विकास संघटने’च्या (OECD) अंदाजांचा संदर्भ देत, या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून कायम राहील अशी अपेक्षा आहे. तसेच, अनुकूल परिस्थिती असल्यास, २०६३ पर्यंत ‘खरेदी शक्ती समते’च्या (Purchasing Power Parity) निकषांवर भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल.
