Ford Rehires Engineers replacing failed AI automation: गेल्या काही महिन्यांपासून एआयमुळे मानवी नोकऱ्या जाणार की राहणार यावर बरीच चर्चा सुरू आहे. तर काही कंपन्यांनी मानवी कर्मचाऱ्यांच्या जागी एआय एजंट्सची नियुक्तीही केली आहे. यामुळे चिंतेत असलेल्या जगभरातील नोकरवर्गासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एआय आणि ऑटोमेशन गुणवत्ता प्रणाली अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू न शकल्याने, उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी फोर्ड या वाहननिर्मिती कंपनीने आपल्या माजी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे.
ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी अमेरिकन वाहन उत्पादक कंपनी फोर्डने गेल्या तीन वर्षांत सुमारे ३५० अनुभवी इंजिनिअर्सना पुन्हा सेवेत घेतले आहे. यामध्ये कंपनीचे माजी कर्मचारी आणि पुरवठादार कंपन्यांमधील तज्ज्ञांचा समावेश आहे.
फोर्ड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कबूल केले आहे की, त्यांनी अनेक दशकांपासून मिळवलेल्या अभियांत्रिकी अनुभवाच्या मूल्याकडे दुर्लक्ष करून ऑटोमेशनवर खूप जास्त अवलंबून राहणे पसंत केले होते. फोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार गल्होत्रा म्हणाले की, कंपनी ऑटोमेशनवर अधिकाधिक अवलंबून राहिली, ज्यामुळे कंपनीची कामगिरी निराशाजनक झाली. त्यांनी पुढे सांगितले की, तांत्रिक तज्ज्ञांना परत कंपनीत आणल्याने सुटे भाग कारखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्यामधील बिघाड ओळखण्यास मदत होत आहे.
फोर्डचे व्हेईकल हार्डवेअर इंजिनिअरिंग विभागाचे उपाध्यक्ष चार्ल्स पून यांनी ब्लूमबर्गला सांगितले की, कंपनीने एआयच्या क्षमतांचा अतिअंदाज लावला होता. एआय हे जरी एक उपयुक्त साधन असले, तरी त्याची परिणामकारकता त्याला प्रशिक्षित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डेटाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
ग्रे बियर्ड इंजिनिअर्स
यावर उपाय म्हणून, फोर्डने ‘ग्रे बियर्ड इंजिनिअर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ३५० हून अधिक अनुभवी इंजिनिअर्सना पुन्हा कामावर घेतले आहे. हे अनुभवी इंजिनिअर्स तरुण कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतात, एआय टूल्सना पुन्हा प्रशिक्षित करण्यास मदत करतात आणि उत्पादन अंतिम टप्प्यात पोहोचण्यापूर्वीच गुणवत्तेतील समस्या ओळखतात.
कुमार गल्होत्रा यांनी सांगितले की, हे अनुभवी इंजिनिअर्स फोर्डच्या पुनरुज्जीवन धोरणात अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करतात आणि समस्या सोडवण्याऐवजी त्या उद्भवण्यापूर्वीच रोखण्यास मदत करतात. “आम्ही समस्या शोधून त्या सोडवण्याच्या मानसिकतेकडून समस्या उद्भवण्यापूर्वीच त्या रोखण्याकडे वाटचाल करत आहोत,” असे त्यांनी एका वेबसाइटला सांगितले.
