वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात जागतिक पातळीवर विद्युत शक्तीवर चालणाऱ्या अर्थात ईव्हींच्या विक्रीत ११ टक्के घट झाली. वर्ष २०२० च्या सुरुवातीला करोना महासाथीचा उद्रेक झाल्यापासून चीनमध्ये झालेली ही सर्वात मोठी विक्री घट असून, त्याचाच परिणाम म्हणून जागतिक विक्रीत ही घसरण दिसून आली आहे, अशी माहिती सल्लागार संस्था ‘बेंचमार्क मिनरल इंटेलिजन्स’ने (बीएमआय) शुक्रवारी दिली.

जगभरातील सरकारांनी विद्युत वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी आखलेल्या धोरणांना कात्री लावण्यास सुरुवात केली असताना, चीनने जुन्या गाड्यांच्या बदल्यात नवीन गाड्या घेताना मिळणारे आर्थिक अनुदान काढून घेतले आहे. शिवाय, चीनमध्ये ईव्ही खरेदीवर मिळणारी करमाफी गेल्या वर्षाच्या अखेरीस संपुष्टात आली आहे.

बीएमआयने दिलेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात मोठी ईव्ही बाजारपेठ असलेल्या चीनमध्ये फेब्रुवारी महिन्यात नवीन बॅटरी-इलेक्ट्रिक आणि प्लग-इन हायब्रिड कारच्या नोंदणीत (जी विक्रीचाच एक निर्देशक मानली जाते) वार्षिक तुलनेत ३२ टक्के घट झाली. यामुळे नोंदणीकृत वाहनांची संख्या ५,००,००० (पाच लाख) पेक्षाही कमी झाली आहे. जागतिक स्तरावर, फेब्रुवारीमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात ईव्ही नोंदणीत घट झाली असून, विक्रीचा आकडा १० लाखांहून थोडाच अधिक राहिला. जानेवारी २०२४ नंतरची ही सर्वात नीचांकी पातळी आहे. उत्तर अमेरिकन बाजारपेठेत ३५ टक्के घट होऊन ९०,००० ईव्ही वाहने विकली गेली. युरोपनेही उत्सर्जनाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या धोरणांत काही प्रमाणात माघार घेतली आहे. असे असले तरी, युरोप खंडात फेब्रुवारीमध्ये ईव्ही विक्रीत २१ टक्के वाढ झाली.