VinFast VF MPV 7 Price Cut : या दिवाळीला तुम्ही ईव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ‘विनफास्ट’ने ग्राहकांसाठी मोठी ऑफर आणली आहे. कंपनीने आपल्या सात आसनी इलेक्ट्रिक एमपीव्ही VF MPV 7 च्या किमतीत थेट ४.१ लाख रुपयांची कपात जाहीर केली आहे. ‘ऑटोकार इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, या दरकपातीनंतर आता या कारची नवी एक्स-शोरूम किंमत २०.३९ लाख रुपये झाली आहे. एप्रिल २०२६ मध्ये ही कार २४.४९ लाख या किमतीत लाँच करण्यात आली होती.
किंमत कपातीमागील कारण काय?
विनफास्ट ही व्हिएतनाममधील लोकप्रिय इलेक्ट्रिक वाहन कार उत्पादक कंपनी आहे. भारतातील वाढत्या इलेक्ट्रिक प्रवासी सेगमेंटमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या नव्या किमतीमुळे VinFast VF MPV 7 कारचे मुख्य स्पर्धक किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही आणि ‘बीवायडी ई-मॅक्स 7 ला तगडी टक्कर मिळणार आहे. या दोन्ही गाड्यांपेक्षा एमपीव्ही VF MPV 7 स्वस्त झाली आहे. दरम्यान, ही ऑफर केवळ सणासुदीसाठी नसून कायमस्वरुपी असल्याचे कंपनीच्या धोरणावरुन दिसत आहे. विनफास्टच्या अधिकृत वेबसाईटवर ही नवी सुधारित किंमत अपडेट करण्यात आली आहे.
गाडीची वैशिष्ट्ये आणि रेंज
किमतीत कपात केली असली तरी कंपनीने गाडीच्या इंजिन, बॅटरी किंवा फिचर्समध्ये कोणताही बदल केलेला नाही. या गाडीसोबत ६०.१३ kWh क्षमता असलेली बॅटरी पॅक मिळते. एका चार्जमध्ये ५१७ किमीची रेंज मिळत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही गाडी ७ आसनी आहे.
कागदावर ४.१ लाखांची कपात नक्कीच आकर्षक आहे. मात्र, ग्राहकांनी खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी गाडीची प्रत्यक्ष रस्त्यावरील रेंज, चार्जिंग नेटवर्कची उपलब्धता, वॉरंटीच्या अटी, सर्व्हिस सेंटर्स आणि राज्यानुसार लागणारा अंतिम ऑन-रोड खर्च यांचा तुलनात्मक अभ्यास करणे गरजेचे आहे.
भारतात ईव्हीची बाजारपेठ विस्तारणार
केंद्र सरकारच्या ईव्ही धोरणांतर्गत, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला सबसिडी आणि सार्वजनिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. २०३० पर्यंत एकूण वाहन विक्रीत ३० टक्के वाटा इलेक्ट्रिक वाहनांचा असावा हे भारताचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे भारतात ईव्ही कंपन्यांची बाजारपेठ विस्तारत आहे.
