Google Alphabet shares crash : एआयच्या (AI) शर्यतीत पुढे राहण्यासाठी जागतिक स्तरावरील दिग्गज टेक कंपन्या अब्जावधी रुपये खर्च करत आहे. मात्र, या तंत्रज्ञानावर होणारा अवाढव्य खर्च आणि त्याच्या परताव्याबाबत अनेक तज्ज्ञ चिंता व्यक्त करत असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. गुगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी तब्बल १३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. तिसऱ्या तिमाहीतील अपेक्षेपेक्षा कमी झालेली विक्री आणि मूळ जाहिरात व्यवसायातील मंदावलेली वाढ यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर कंपनीकडून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ वर केल्या जाणाऱ्या अब्जावधी डॉलरच्या खर्चावर आता गुंतवणूकदारांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकन शेअर बाजार उघडताच अवघ्या पाच मिनिटांत अल्फाबेटचा शेअर १३.२ टक्क्यांनी घसरून २७९.४३ डॉलरवर आला. न्यू यॉर्कच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ९:३५ वाजेपर्यंत शेअर २८१.३७ डॉलरवर (१३% घसरण) व्यवहार करत होता. या विक्रीमुळे कंपनीचे ५०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त बाजार भांडवल एकाच दिवसात स्वाहा झाले. अल्फाबेटच्या इतिहासातील ही एकाच दिवसातील सर्वात मोठी बाजार मूल्याची घसरण ठरली आहे.
AI गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह
एआय क्रांतीमुळे गुगलच्या सर्च आणि जाहिरात व्यवसायावर परिणाम झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अल्फाबेटचा तिसऱ्या तिमाहीतील निव्वळ महसूल १११.२ अब्ज डॉलर राहिला, जो विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा कमी आहे. कंपनीच्या एकूण कमाईपैकी जवळपास ५० टक्के वाटा असणाऱ्या ‘सर्च आणि इतर’ जाहिरातींच्या महसुलात गेल्या पाच तिमाहींमधील सर्वात कमी वाढ नोंदवली गेली. एका बाजूला जाहिरातींची कमाई मंदावली असताना, दुसरीकडे एआय इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कंपनीला डेटा सेंटर्स, कॉम्प्युटिंग आणि ऊर्जेसाठी भविष्यात १ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार आहे.
जेपी मॉर्गनचे वरिष्ठ विश्लेषक डग अनमुथ यांनी स्पष्ट केले की, “जेव्हा एखादी हायपरस्केल कंपनी एआय इन्फ्रास्ट्रक्चरवर शेकडो अब्ज डॉलर खर्च करते आणि तिच्या मूळ व्यवसायात अपयश येते, तेव्हा बाजारात सुधारणेसाठी खूप कमी वाव राहतो.”
AI Mode मुळे मॉनिटायझेशनचे नवे आव्हान
अल्फाबेटचे चीफ बिझनेस ऑफिसर फिलीप शेंडलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गूगल सर्चमधील नव्या AI Mode टॅबच्या वाढत्या वापराचा फटका कंपनीच्या निकालांना बसला आहे. एआय सर्च क्वेरींमधून जाहिरातींद्वारे मिळणारा महसूल पारंपारिक सर्चच्या तुलनेत कमी आहे, असे शेंडलर यांनी स्पष्ट केले. मात्र, भविष्यात या एआय टॅबमध्ये अधिक जाहिराती समाविष्ट करून कमाई वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे.
सध्या युजर्स माहिती शोधण्यासाठी गूगल सर्चऐवजी ChatGPT, Claude आणि गुगलच्याच AI साधनांचा वापर करत आहेत. त्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्यावर एआयमधील अवाढव्य गुंतवणुकीतून शाश्वत परतावा मिळवून दाखवण्याचा प्रचंड दबाव वाढला आहे.
मायक्रोसॉफ्टची बाजी, गूगलच्या चिंतेत वाढ
अल्फाबेटचे शेअर्स घसरत असताना मायक्रोसॉफ्ट कंपनीसाठी सकारात्मक बातमी आहे. मायक्रोसॉफ्टने आपल्या क्लाउड व्यवसायात अपेक्षेपेक्षा चांगली वाढ नोंदवली. कंपनीला भांडवली खर्चात नियंत्रणात ठेवण्यात यश मिळालं. परिणामी त्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
