Google Alphabet Voluntary Severance AI Cost : कृत्रिम प्रज्ञा अर्थात AI क्षेत्रातील स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. जागतिक स्तरावरील दिग्गज टेक कंपन्या या शर्यतीत पुढे राहण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतत आहेत. मात्र, सध्या हे तंत्रज्ञान कंपन्यांसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. हा अवाढव्य खर्च भागवण्यासाठी गेल्या आठवड्यात टेक जायंट ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीने तब्बल ६०,००० कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती निवृत्ती घेण्याचा पर्याय दिला होता. या पावलावर पाऊल ठेवत आता गुगलची पालक कंपनी ‘अल्फाबेट’ने असाच निर्णय घेतला आहे. ही योजना आता जगातील आणखी ५ देशांमध्ये लागू केली आहे. ‘रॉयटर्स’ने दिलेल्या अहवालानुसार, गुगलने या वर्षी जून महिन्यापासून कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान आणि स्वित्झर्लंडमधील कर्मचाऱ्यांसाठी ही ऑफर खुली केली आहे.
AI मधील गुंतवणुकीचा दबाव आणि खर्चात कपात
सध्या सर्वच प्रमुख टेक कंपन्यांमध्ये ‘एआय’ आणि ‘क्लाउड कॉम्प्युटिंग’ क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. यासाठी कंपन्यांना पायाभूत सुविधांवर अब्जावधी डॉलर्स खर्च करावा लागत आहे. दुसरीकडे गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याविषयी शंका निर्माण झाल्याने त्याचा फटका अल्फाबेटच्या शेअरला बसला. अल्फाबेटचे शेअर तब्बल एकाच दिवसात १३ टक्के घसरले. याच पार्श्वभूमीवर कंपनीने काही विभागांतील कर्मचाऱ्यांसाठी हे एक्झिट पॅकेज जाहीर केले आहे.
नेमके काय म्हणाले गुगलचे प्रवक्ते?
या निर्णयाबाबत बोलताना गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले, “२०२५ मध्ये आमच्या काही टीम्सनी नुकसानभरपाई पॅकेजसह स्वेच्छानिवृत्ती कार्यक्रम सुरू केला होता. आगामी काही महत्त्वाच्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देण्यासाठी हा कार्यक्रम काही निवडक देशांमध्ये जागतिक स्तरावर राबवली जाणार आहे.”
स्वित्झर्लंडमधील कर्मचाऱ्यांना १ वर्षांचे वेतन
स्वित्झर्लंडमध्ये झुरिच येथे गुगलचे मोठे इंजिनिअरिंग हब असून तेथे सुमारे ५,००० कर्मचारी कार्यरत आहेत. तिथे ही योजना बहुतांश विभागांसाठी लागू करण्यात आली होती. कंपनीने जूनच्या मध्यवधीत या पॅकेजची घोषणा केली होती. ऑफर स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळातील प्रत्येक वर्षासाठी १ महिन्याचा पगार, अशा प्रकारे कमाल १२ महिन्यांच्या वेतनापर्यंतचे पॅकेज देण्यात आले.
DeepMind आणि Cloud विभागांना सवलत
गुगलच्या ‘गुगल क्लाउड’ आणि ‘दीपमाइंड’ या महत्त्वाच्या विभागांतील कर्मचाऱ्यांना या स्वेच्छानिवृत्ती योजनेतून वगळण्यात आले आहे.
डिस्ने, कॅन्वामध्ये कर्मचारी कपातीची घोषणा
यापूर्वी द वॉल्ट डिस्ने आणि कॅन्वा या दोन कंपन्यांनी मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. एआय वरील वाढता खर्च आणि महसूल घटल्याने कंपनीने हे निर्णय घेतले आहेत.
