Google Pay Ask AI Feature : डिजिटल पेमेंट (गुगल पे, फोन पे सारखी ॲप्स) आल्याने आज भाजीच्या जुडीपासून ते अगदी गृहकर्जाच्या हप्त्यापर्यंत सर्वच व्यवहार अत्यंत सोपे झाले आहेत. मात्र, यामुळे अवाजावी खर्चाचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर युजर्सच्या आर्थिक नियोजनासाठी आणि मदतीसाठी ‘गूगल पे’ने (Google Pay) अत्यंत महत्त्वाचे एआय (AI) टूल सादर केले आहे. कंपनीने आपल्या ॲपमध्ये Ask Google Pay हे कृत्रिम प्रज्ञेवर (AI) आधारित नवीन टूल आणलं आहे. हे तुमच्या आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण आणि पैशांचे व्यवस्थापन करण्यास मदत करणार आहे.
Ask Google Pay नक्की काय आहे?
ॲमेझॉनचं ॲलेक्स माहितीये? तशाच पद्धतीचे Ask Google Pay हे संवाद साधणारं टूल आहे. तुमचा महिनाभरात कुठे आणि कसा खर्च झाला, हे शोधणे आता अधिक सोपे होणार आहे. हे फिचर केवळ खर्चाचा हिशोब ठेवणार नाही, तर बचत कशी वाढवावी, योग्य क्रेडिट कार्ड कसे निवडावे आणि आर्थिक साक्षर होण्यासाठी युजर्सना मार्गदर्शन करणार आहे. उदा. एखाद्या महिन्यात तुम्ही अनेकदा हॉटेलमध्ये जेवलात तर तुमचे बजेट कसे बिघडू शकते, याचं गणित तुम्हाला समाजावून सांगितले जाईल.
या फिचरची मुख्य वैशिष्ट्ये
- हे टूल इंग्रजीसह १० भारतीय भाषांमध्ये टेक्स्ट आणि व्हॉईस अशा दोन्ही माध्यमांत काम करते.
- तुम्ही थेट माझा या आठवड्याचा खर्च दाखव किंवा माझ्यासाठी कोणते क्रेडिट कार्ड योग्य आहे? असे प्रश्न विचारू शकता.
- एसआयपी, चक्रवाढ व्याज, CIBIL स्कोर किंवा टॅक्सशी संबंधित अवघड संकल्पना हे AI अत्यंत सोप्या भाषेत समजून सांगते.
डेटा आणि प्रायव्हसी किती सुरक्षित?
- आर्थिक माहिती अत्यंत संवेदनशील असल्याने गूगलने सुरक्षेवर विशेष भर दिल्याचा दावा केला आहे.
- हे फिचर बाय-डिफॉल्ट बंद असणार असून युजर्सनी स्वतः सेटिंग सुरू केल्याशिवाय ते ॲक्टिव्ह होणार नाही.
- बँक खाते क्रमांक, संपूर्ण कार्ड डिटेल्स किंवा सरकारी ओळखपत्रे (पॅन/आधार) अशी अतिसंवेदनशील माहिती हे AI साठवून ठेवत नाही किंवा प्रोसेस करत नाही.
- युजर्सचा आर्थिक डेटा गूगलच्या सार्वजनिक AI मॉडेल्सना ट्रेनिंग देण्यासाठी वापरला जाणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.
हे फिचर कसे सुरू करावे?
- ॲप उघडा आणि सेटिंग्जमध्ये जा : गूगल पे ॲप ओपन करून Profile > Settings > Privacy & Security > Data and personalisation या पर्यायावर क्लिक करा.
- पर्सनलायझेशन ऑन करा : तेथे ‘Personalisation within Google Pay’ हा पर्याय Turn On (सुरू) करा.
- AI शी चॅट सुरू करा : होम स्क्रीनवरील Money टॅबमध्ये जा. तेथे ‘Ask About your finances’ सेक्शनखाली Ask a question वर टॅप करून संवाद सुरू करा.
यूपीआयमुळे डिजिटल पेमेंट अत्यंत सोपे झाले असले, तरी वैयक्तिक आर्थिक नियोजन समजणे अनेकांसाठी कठीण असते. गूगल पे मधील हे AI फिचर सामान्य युजर्सना अधिक साक्षर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल. पण, डेटा आणि प्रायव्हसीसाठी सरकार काय पाऊल उचलते? हे पाहणेही महत्वाचे आहे.
