Gopal Vittal GSMA Chairman Re-election : जागतिक मोबाइल दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांची संघटना असलेल्या जीएसएमएच्या संचालक मंडळाने भारती एअरटेलचे कार्यकारी उपाध्यक्ष गोपाल विट्टल यांची आगामी २०२७-२८ या कार्यकाळासाठी पुन्हा अध्यक्षपदी निवड केली आहे. डिसेंबर २०२८ पर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील. विट्टल गेल्या दहा वर्षांपासून जीएसएमएच्या संचालक मंडळावर असून, २०२५ पासून ते अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
जीएसएमएच्या संचालक मंडळाने एमटीएन समूहाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राल्फ मुपिटा यांची सहउपाध्यक्षपदी फेरनिवड केली आहे. त्यांच्यासोबत व्होडाफोन समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मार्गरिटा डेला व्हॅले यांचीही सहउपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
‘दूरसंचार क्षेत्र एका नव्या युगात प्रवेश करत आहे. प्रगत दूरसंचार नेटवर्क, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि खुल्या डिजिटल मंचांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था आणि समाजासाठी मोठे मूल्य निर्माण करण्याची संधी आहे. मात्र, या क्षेत्रासमोरील सर्वांत महत्त्वाचे प्राधान्य सुरक्षेला आहे. वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर देशांची सुरक्षा, ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांपासून ग्राहकांचे संरक्षण आणि दूरसंचार उद्योगाची आर्थिक शाश्वतता या बाबींवर भर देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानातील गुंतवणूक सुरू ठेवण्यासाठी आणि जगभरात दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यासाठी उद्योग सक्षम राहणे गरजेचे आहे,’ असे फेरनिवडीनंतर गोपाल विट्टल यांनी सांगितले.
विट्टल हे भारती एअरटेलचे कार्यकारी उपाध्यक्ष असून, ग्राहकसंख्येच्या दृष्टीने एअरटेल ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोबाइल सेवा कंपनी आहे. एअरटेल आणि तिच्या उपकंपन्यांचे कामकाज, समूहाची व्यूहरचना, डिजिटल व तंत्रज्ञानविषयक उपक्रम, नेटवर्क धोरण, खरेदी आणि मनुष्यबळ व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. ते एअरटेल आफ्रिका आणि एअरटेल पेमेंट्स बँकेचे बिगरकार्यकारी अध्यक्ष, तसेच बीटी समूहाच्या संचालक मंडळाचे बिगरकार्यकारी संचालकही आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली एअरटेलने मोबाइल, गृह ब्रॉडबँड, व्यावसायिक सेवा आणि डिजिटल सेवांमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे.
राल्फ मुपिटा सप्टेंबर २०२० पासून एमटीएन समूहाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी समूहाचे मुख्य वित्त अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. एप्रिल २०२५ पासून ते जीएसएमएचे सहउपाध्यक्ष आहेत. आफ्रिकेतील कनेक्टिव्हिटी, फिनटेक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमधील संधींचा विस्तार करण्यावर भर देणाऱ्या एमटीएनच्या ‘अॅम्बिशन २०३०’ या धोरणाचे नेतृत्व ते करत आहेत.
मार्गरिटा डेला व्हॅले जानेवारी २०२३ पासून व्होडाफोन समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यापूर्वी २०१८ पासून त्यांनी समूहाच्या मुख्य वित्त अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली व्होडाफोनने अधिक सुटसुटीत आणि सक्षम व्यावसायिक रचनेकडे वाटचाल केली आहे.
