Grindr App Data Privacy Lawsuit details: इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडमधील (युनायटेड किंग्डम) हजारो युजर्सनी दाखल केलेला खटला मिटवण्यासाठी जगातील सर्वात मोठे LGBTQ+ डेटिंग ॲप ग्राइंडर २६ दशलक्ष पाउंडची रक्कम भरपाई म्हणून देणार आहे. याचे भारतीय रुपयांमध्ये सुमारे ३२२ कोटी रुपये इतके मूल्य होते. युजर्सचा असा आरोप आहे की, या अमेरिकन डेटिंग ॲपने जाहिरात कंपन्यांसोबत त्यांची अत्यंत संवेदनशील वैयक्तिक माहिती शेअर केली आहे. शेअर केलेल्या माहितीमध्ये युजर्सच्या एचआयव्ही स्टेटसचाही समावेश आहे.

या तडजोडीमुळे आता दोन वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईचा शेवट झाला आहे. युकेमधील ऑस्टेन हेस या लॉ फर्मने एप्रिल २०२४ मध्ये इंग्लंड आणि वेल्सच्या उच्च न्यायालयात ग्राइंडर युजर्सच्या वतीने हा दावा दाखल केला होता. यात २०२० च्या सुरुवातीपर्यंतच्या कालावधीत युनायटेड किंग्डमच्या गोपनीयतेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

लंडनस्थित ऑस्टेन हेस लॉ फर्मने या खटल्यात १२,००० लोकांचे प्रतिनिधित्व केले होते. जर २६ दशलक्ष पाउंडची ही रक्कम समान रीतीने वाटली गेली, तर प्रत्येक व्यक्तीला सरासरी २,१६७ पाउंड (सुमारे २ लाख ६९ हजार रुपये) इतकी नुकसानभरपाई मिळेल.

समलिंगी पुरुषांसाठी हुकअप्स आयोजित करणे सोपे व्हावे म्हणून २००९ मध्ये ग्राइंडरची स्थापना झाली होती. आता ते समलिंगी, उभयलिंगी, ट्रान्स आणि क्विअर लोकांसाठी जगातील सर्वात मोठे डेटिंग ॲप असल्याचा दावा करतात, ज्याचे जगभरात जवळपास १८६ कोटी युजर्स आहेत.

अमेरिकेतील शेअर बाजारांना ग्राइंडरने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी युनायटेड किंगडममधील सामूहिक कायदेशीर कारवाई निकाली काढली आहे. ही कारवाई २०२० पूर्वीच्या ‘डेटा हाताळणीच्या पद्धतींशी’ संबंधित होती. त्या काळात ग्राइंडरची मालकी आणि नियंत्रण चीनमधील बीजिंग कुनलुन टेक या गेमिंग कंपनीकडे होते.

कंपनीचा युक्तिवाद

कॅलिफोर्नियास्थित या कंपनीने म्हटले आहे की, या तडजोडीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष किंवा दायित्व मान्य करण्यात आलेले नाही. जरी ग्राइंडरने आपल्यावरील आरोप फेटाळले असले, तरी २०२० पूर्वीच्या त्या कालावधीबाबत यूकेमधील काही युजर्सनी व्यक्त केलेली अस्वस्थता आणि त्यांचा झालेला विश्वासभंग याची कंपनी दखल घेते आणि ती मान्य करते.

यूकेमधील या तडजोडीचा एक भाग म्हणून, ग्राइंडर’ने या वर्षाच्या अखेरीस १३ दशलक्ष पाउंड आणि मार्च २०२७ च्या अखेरीस आणखी १३ दशलक्ष पाउंड भरपाई देण्याचे मान्य केले आहे.