HCL Tech CEO C Vijayakumar salary hike reveals staggering earnings in the Indian IT sector amid AI challenges: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) आव्हानांमुळे भारताचे आयटी क्षेत्र सध्या अस्थिरतेचा सामना करत आहे. या परिस्थितीतह एटसीएल टेकचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सी. विजयकुमार यांनी सलग तिसऱ्या वर्षी भारतीय आयटी कंपन्यांमधील सर्वाधिक वेतन घेणारे सीईओ म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, त्यांचे एकूण वेतन ६७ टक्क्यांनी वाढून सुमारे १७५ कोटी रुपये इतके झाले आहे. याचाच अर्थ असा की, सी. विजयकुमार यांना दर दिवसाला ४८ लाख २१ हजार ९१८ रुपये वेतन मिळते.

सी. विजयकुमार यांच्या एकूण वेतनामध्ये २३.८८ कोटी रुपये मूळ वेतन, १९.२६ कोटी रुपये कामगिरीवर आधारित बोनस, ३७.९५ कोटी रुपये दीर्घकालीन प्रोत्साहन भत्ता (रोखे स्वरूपातील), ९०.५३ कोटी रुपये दीर्घकालीन प्रोत्साहन भत्ता (आरएसयूच्या मिळालेल्या लाभाचे मूल्य) आणि २.९९ कोटी रुपयांच्या विविध सुविधा, लाभ आणि भत्ते यांचा समावेश आहे.

सी. विजयकुमार यांचे हे वेतन एचसीएल टेकच्या कर्मचाऱ्यांच्या सरासरी वेतनाच्या २९१.९ पट जास्त आहे. ३० जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनीची एकूण कर्मचारी संख्या सुमारे २,२७,१८१ इतकी आहे.

विजयकुमार सध्या अमेरिकेत कार्यरत आहेत आणि त्यांना एचसीएल टेकची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या ‘एचसीएल अमेरीका’ कडून वेतन दिले जाते. दरम्यान, विजयकुमार यांचे वेतन पॅकेज इन्फोसिसचे सलिल पारेख यांच्यापेक्षा २.१ पट, टेक महिंद्राचे मोहित जोशी यांच्यापेक्षा २.६ पट, विप्रोचे श्रीनिवास पल्लिया यांच्यापेक्षा ३.३ पट आणि टीसीएसचे के. कृतीवासन यांच्यापेक्षा ६.२ पटींहून अधिक आहे.

एचसीएल टेकचे पहिल्या तिमाहीचे निकाल

जून २०२६ च्या तिमाहीत या आयटी कंपनीने आपल्या एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर २०.३२% वाढ नोंदवली. एचसीएल टेकने २०२७ च्या पहिल्या तिमाहित ४,६२४ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत हा नफा ३,८४३ कोटी रुपये होता.

या प्रमुख आयटी कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसुलात १३.९४% वाढ झाली असून, तो ३०,३४९ कोटी रुपयांवरून ३४,५७९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एचसीएल टेकने १६.९% इतका EBIT मार्जिन नोंदवला, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ५६ बेसिस पॉइंट्सने अधिक आहे.