HCL Tech former CEO On AI And Employment: एचसीएल टेक्नॉलॉजीजचे माजी सीईओ विनीत नायर यांनी दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटमध्ये बोलताना इशारा दिला की, भारतीय आयटी कंपन्या येत्या काळात रोजगारापेक्षा नफ्यावर लक्ष केंद्रित करतील, कारण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, फॅक्टरी वर्कपासून संगीत आणि चित्रपटांपर्यंत असंख्य उद्योगांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) फटका बसण्याचा धोका आहे.

“रोजगाराच्या दृष्टिकोनातून, मला वाटते की भारतीय कंपन्या, ज्यामध्ये भारतीय आयटी कंपन्यांचाही समावेश आहे, नफा मिळवण्यासाठीच काम करतील हे समजून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला असे वाटत असेल की त्या रोजगार निर्माण करतील तर तुम्ही स्वप्न पाहत आहात. म्हणूनच, प्रश्न असा आहे की या वातावरणात आपण रोजगार कसा निर्माण करायचा”, असे नायर म्हणाले.

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक सेवा आणि तंत्रज्ञानाचा मोठा वापर असलेली क्षेत्रे असल्यामुळे देश असुरक्षित ठरू शकतो आणि अलिकडच्या काळात देशातील आउटसोर्सिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. याचे एक कारण एआय असिस्टंट टूल्समधील प्रगती आहे. या पार्श्वभूमीवर नायर यांचे विधान लक्षवेधी ठरत आहे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या मानव-केंद्रित एआय संस्थेनुसार, एआय स्पर्धात्मकतेमध्ये भारत जागतिक स्तरावर अमेरिका आणि चीनच्या मागे तिसऱ्या क्रमांकावर आहे. ओपनएआय आणि अँथ्रोपिक सारख्या मोठ्या कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणावर काम सुरू करत आहेत आणि एंटरप्राइझ ग्राहक, विकासक आणि सरकारी संस्थांना आकर्षित करत आहेत.

चॅटजीपीटी, जेमिनी आणि क्लॉड सारख्या मॉडेल्ससाठी सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात सेवा देण्यासाठी गुगल आणि मेटा डेटा सेंटर्सचा विस्तार करत आहेत.

चीनमधील हाय-एंड चिप्सवरील अमेरिकेच्या निर्यात निर्बंधांमुळे दबावाखाली असलेली एनव्हिडिया कॉर्प. भारताकडे पर्यायी बाजारपेठ म्हणून पाहत आहे. असे असले तरी त्यांच्या प्रमुखांनी शेवटच्या क्षणी “अनपेक्षित परिस्थिती” असल्याचे कारण देत दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटमधून माघार घेतली.

एआय नोकऱ्या नष्ट करणार?

फोर्ड, अमेझॉन, सेल्सफोर्स आणि जेपी मॉर्गन चेस या कंपन्यांच्या सीईओंसह आघाडीच्या सीईओंनी जाहीर केले आहे की त्यांच्या कंपन्यांमधील अनेक पदे लवकरच संपुष्टात येतील.

मायक्रोसॉफ्ट एआयचे सीईओ मुस्तफा सुलेमान यांनीही अशीच भीती व्यक्त केली होती. त्यांनी इशारा दिला होता की, कंपनी “प्रोफेशनल-ग्रेड एजीआय”च्या विकासाला गती देत असताना पुढील १२ ते १८ महिन्यांत एआयमुळे व्हाईट-कॉलर नोकऱ्या संपुष्टात येऊ शकतात.