HCLTech CEO C Vijaykumar faces public protest over salary hike demand by IT employees: कर्मचाऱ्यांना आपल्या सीईओंशी थेट संवाद साधण्याची संधी रोजच मिळते असे नाही. पण HCLTech च्या कर्मचाऱ्यांना नुकतीच ही संधी मिळाली होती. मिळालेल्या या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेत जाहीरपणे पगारवाढीची मागणी केली. चेन्नईमध्ये कंपनीच्या ५० व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरू असताना, HCLTech चे सीईओ सी. विजयकुमार व्यासपीठावर आले, तेव्हा कर्मचाऱ्यांनी “आम्हाला पगारवाढ हवी आहे” (we want a hike) अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

व्हिडिओमध्ये कैद झालेला हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, विजयकुमार उपस्थितांशी संवाद साधण्याची तयारी करत असताना शेकडो कर्मचारी “आम्हाला पगारवाढ हवी आहे… आम्हाला पगारवाढ हवी आहे”, अशा घोषणा देताना ऐकू येत आहे.

ते व्यासपीठावर येताच घोषणांचा आवाज अधिकच वाढला. कर्मचाऱ्यांनी सीईओंचे नेहमीप्रमाणे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्याऐवजी या प्रसंगाचा वापर पगारवाढ न झाल्याबद्दलची आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी केला. घोषणाबाजी सुरू असताना विजयकुमार शांत आणि संयमी राहिले. त्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना अभिवादन केले, परंतु पगारवाढीच्या मागणीवर मात्र कोणतेही थेट भाष्य केले नाही.

हा व्हिडिओ ‘एक्स’ आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल झाला आणि त्यावर युजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने ‘एक्स’वर टिप्पणी केली, “कर्मचाऱ्यांच्या घोषणांप्रमाणेच त्यांच्या पगारातही मोठी वाढ होईल, अशी आशा आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “केवळ त्यांच्याच (सीईओ) पगारात दरवर्षी १०० टक्क्यांहून अधिक वाढ होते, तर इतर कष्टाळू कर्मचाऱ्यांना ५ टक्के वाढ मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागतो.”

दरम्यान, अनेक युजर्सनी असा प्रश्नही उपस्थित केला आहे की, कंपनीच्या कार्यक्रमांदरम्यान सार्वजनिकरीत्या निदर्शने करणे हा कर्मचाऱ्यांसाठी अधिक चांगल्या पगाराची मागणी करण्याचा योग्य मार्ग आहे का?

ही घटना अशा वेळी समोर आली आहे जेव्हा भारतातील आयटी क्षेत्रातील पगारवाढीचे प्रमाण मर्यादित राहिले आहे. मागणीत घट झाल्यामुळे जागतिक ग्राहकांनी अनावश्यक किंवा ऐच्छिक खर्चात कपात केली होती. त्यामुळे इतर अनेक आयटी कंपन्यांप्रमाणेच HCLTech नेही गेल्या दोन वर्षांत वेतनवाढीवर नियंत्रण ठेवले आहे.

व्यवसायाच्या परिस्थितीत सुधारणेची चिन्हे दिसत असली, तरी कर्मचाऱ्यांचे वेतन हा अजूनही एक महत्त्वाचा चिंतेचा विषय आहे. HCLTech ने या वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अद्याप वेतनवाढीची घोषणा केलेली नाही.

सीईओ विजयकुमार यांना सुमारे १७५ कोटी रुपये पगार

एटसीएल टेकचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सी. विजयकुमार यांनी सलग तिसऱ्या वर्षी भारतीय आयटी कंपन्यांमधील सर्वाधिक वेतन घेणारे सीईओ म्हणून आपले स्थान कायम आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, त्यांचे एकूण वेतन ६७ टक्क्यांनी वाढून सुमारे १७५ कोटी रुपये इतके झाले आहे. याचाच अर्थ असा की, सी. विजयकुमार यांना दर दिवसाला ४८ लाख २१ हजार ९१८ रुपये वेतन मिळते.