पुणे: बँकेतर वित्तीय कंपनी आयआयएफएल फायनान्स लिमिटेडने १ हजार रुपये दर्शनी मूल्याच्या सुरक्षित विमोचनयोग्य अपरिवर्तनीय रोख्यांची (एनसीडी) विक्री मंगळवारपासून (१७ फेब्रुवारी) प्रस्तावित केली आहे. विविध मुदत कालावधीच्या मालिकांद्वारे खुल्या होत असलेल्या या रोख्यांतून वार्षिक ९ टक्क्यांपर्यंत प्रभावी लाभ गुंतवणूकदारांना मिळविता येईल.
आयआयएफएल फायनान्स ही आघाडीची बँकेतर वित्तीय कंपनी आहे. कंपनीचे घरांसाठी कर्ज, सोने तारण कर्ज, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना कर्ज असे प्रमुख व्यवसाय विभाग आहेत. या रोखे विक्रीतून कंपनीने ५०० कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे.
अतिरिक्त भरणा झाल्यास आणखी १,५०० कोटी रुपये राखून ठेवण्याच्या पर्यायाद्वारे एकूण २ हजार कोटी रुपये उभारले जाणार आहेत. या रोखे विक्रीतून उभारण्यात येणारा निधी कंपनीवरील सध्याच्या कर्जाची फेड, व्यवसाय विस्तार आणि पुढील कर्ज वितरणासाठी वापरला जाणार आहे. गुंतवणूकदारांना किमान १० रोखे अर्थात १० हजार रुपयांची गुंतवणूक अनिवार्य आहे. त्यानंतर १ हजार रुपयांच्या पटीत त्यांना अर्ज करता येईल. रोखे विक्री ४ मार्चपर्यंत जरी खुली राहणार असली तरी भरणा पूर्ण झाल्यास त्या आधीच ती बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. विक्रीपश्चात या डिमॅट स्वरूपातील रोख्यांची मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारावर सूचिबद्धता केली जाणार आहे.
बाह्य उसनवारीत वाढीचे संकेत
आयआयएफएल फायनान्स आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत बाह्य व्यावसायिक कर्ज (ईसीबी) आणि परकीय चलन कर्जाचा हिस्सा त्यांच्या एकूण कर्जदायीत्वात सध्याच्या १३ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे. सध्या, आयआयएफएल फायनान्सचे एकूण बाह्य कर्ज ५,९३७ कोटी रुपये आहे, ज्यामध्ये ईसीबीचा वाटा २,२५७ कोटी रुपये आणि डॉलरमधील रोख्यांतून उभारलेला निधी ३,६८० कोटी रुपये असा आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक निर्मल जैन यांनी सांगितले. तर देशा-विदेशांतून कंपनीची एकूण उसनवारी ६०,६४० कोटी रुपयांची असून, त्यात कर्जरोख्यांचा वाटा सुमारे ३१ टक्के आहे.

