ओंकार अरुण भिडे
भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेचा विचार केला, तर अनेक दशकं एकच प्रश्न केंद्रस्थानी होता – “किती देते?” मायलेज म्हणजेच गाडीचा आत्मा, अशीच धारणा होती. ग्राहक गाडी घेताना सुरक्षिततेपेक्षा इंधन खर्चाला जास्त महत्त्व देत होता. मात्र, गेल्या दहा-पंधरा वर्षांत हा दृष्टीकोन हळूहळू पण ठामपणे बदलतो आहे. आजचा ग्राहक केवळ किती देते एवढ्यावर थांबत नाही, तर “ही गाडी किती सुरक्षित आहे?”, “अपघात टाळण्यासाठी यात कोणती तंत्रज्ञानं आहेत?” असे प्रश्नही विचारतो आहे.

या मानसिक बदलामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव, इंटरनेटमुळे सहज उपलब्ध होणारी माहिती, सोशल मीडियावर अपघातांची दृश्ये, क्रॅश टेस्ट रिपोर्ट्स, तसेच कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत वाढलेली संवेदनशीलता – या सगळ्यांचा थेट परिणाम वाहन खरेदीच्या निर्णयावर होतो आहे.

कंपन्यांवर वाढणारा दबाव

ग्राहकांची बदलती अपेक्षा पाहता वाहन उत्पादक कंपन्यांनाही आपल्या उत्पादनांमध्ये मोठे बदल करावे लागत आहेत. आज केवळ आकर्षक डिझाइन किंवा दमदार इंजिन पुरेसे राहिलेले नाही. फीचर-लोडेड आणि सेफ्टी-ओरिएंटेड गाड्या देणे ही काळाची गरज बनली आहे. याला जोड मिळाली आहे ती सरकारच्या धोरणांची. केंद्र सरकारने रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन सुरक्षेवर विशेष भर दिला आहे. दुचाकी असो वा चारचाकी, प्रत्येक वाहन अधिक सुरक्षित कसे होईल, यासाठी नियम कठोर केले जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर पूर्वी फक्त लक्झरी किंवा प्रीमियम गाड्यांपुरती मर्यादित असलेली फीचर्स –
एबीएस, ईबीडी, हिल होल्ड असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, ऑल-डिस्क ब्रेक्स, पॉवर टेलगेट –
आता मिड-सेगमेंट आणि मास मार्केट गाड्यांमध्येही दिसू लागली आहेत.

ADAS : सुरक्षिततेकडे टाकलेले पुढचे पाऊल

या संपूर्ण प्रवासातील पुढचे आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे – ADAS (Advanced Driver Assistance System). जागतिक पातळीवर अडास तंत्रज्ञानाचा वापर पाच ते सात वर्षांपूर्वी सुरू झाला. भारतात सुरुवातीला केवळ प्रीमियम आणि लक्झरी गाड्यांमध्ये मर्यादित स्वरूपात अडास उपलब्ध होते. मात्र, सुरक्षिततेला प्राधान्य देणारा ग्राहकवर्ग वाढत असल्याने आता मास मार्केट गाड्यांमध्येही अडास सिस्टिम देण्याकडे कंपन्यांचा कल वाढतो आहे.

ADAS म्हणजे नक्की काय?

सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी किंवा त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी मदत करणारे तंत्रज्ञान म्हणजे ADAS. आजही बहुतांश अपघात मानवी चुकांमुळे होतात – थकवा, लक्ष विचलित होणे, चुकीचा अंदाज, ओव्हरस्पीडिंग किंवा अचानक प्रतिक्रिया न देणे. ADAS प्रणाली या सगळ्या बाबींमध्ये ड्रायव्हरला सहाय्य करते. भविष्यातील पूर्ण स्वयंचलित वाहनांच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल मानले जाते. त्यामुळेच ADAS ला स्वायत्त वाहन तंत्रज्ञानाचा पाया असेही म्हटले जाते.

ADAS कसं कार्य करतं?

ADAS ही प्रामुख्याने कॅमेरा, रडार आणि सेन्सरवर आधारित प्रणाली आहे. वाहनाच्या आजूबाजूची परिस्थिती टिपण्यासाठी पुढील घटक वापरले जातात –

  • फ्रंट आणि रियर कॅमेरे
  • रडार सेन्सर्स
  • अल्ट्रासोनिक सेन्सर्स

हे सगळे डेटा सॉफ्टवेअर आणि अल्गोरिदमद्वारे विश्लेषित केले जातात. त्यानुसार प्रणाली ड्रायव्हरला सूचना देते किंवा आपत्कालीन परिस्थितीत स्वतःहून हस्तक्षेप करते.

उदाहरणार्थ –

  • समोरचे वाहन अचानक थांबल्यास आपोआप ब्रेक लावणे
  • लेन सोडल्यास इशारा देणे
  • ब्लाइंड स्पॉटमध्ये वाहन आल्यास चेतावणी देणे

ड्रायव्हरची जागा घेत नाही. मात्र, ADAS ही ड्रायव्हरची जागा घेणारी प्रणाली नाही. ती केवळ सहाय्यक आहे, हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ADAS विकसित करणाऱ्या कंपन्या जागतिक पातळीवर ADAS सिस्टिम विकसित करणाऱ्या प्रमुख कंपन्या पुढीलप्रमाणे –

  • बॉश (Bosch)
  • एप्टिव्ह (Aptiv)
  • काँटिनेंटल AG
  • डेन्सो कॉर्पोरेशन
  • हेल्ला
  • हिताची
  • ह्युंदाई

याशिवाय, भारतातही काही कंपन्या आणि स्टार्टअप्स ADAS क्षेत्रात सक्रिय होत आहेत.

ADAS चा इतिहास

ADAS ची संकल्पना अचानक निर्माण झालेली नाही. १९५० च्या दशकात पॉवर स्टिअरिंग आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ही त्याची सुरुवात मानली जाते. १९८० ते १९९० च्या काळात जर्मन शास्त्रज्ञ अर्नस्ट डिकमन्स यांनी या तंत्रज्ञानाचा पाया मजबूत केला. २००० नंतर Mobileye या कंपनीने लेन डिपार्चर वॉर्निंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग आणि पादचारी ओळख प्रणाली विकसित करून अडासला व्यावहारिक स्वरूप दिले.आज ही फीचर्स अनेक गाड्यांमध्ये ‘स्टँडर्ड’ बनत चालली आहेत.

ADAS चे लेव्हल किती?

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (SAE) नुसार ADAS चे एकूण ६ लेव्हल आहेत.

  • लेव्हल 0 – कोणतेही ऑटोमेशन नाही
  • लेव्हल 1 – मर्यादित सहाय्य
  • लेव्हल 2 – पार्शल ऑटोमेशन
  • लेव्हल 3 – कंडिशनल ऑटोमेशन
  • लेव्हल 4 – हाय ऑटोमेशन
  • लेव्हल 5 – फुल ऑटोमेशन

? भारतात सध्या प्रामुख्याने लेव्हल 1 आणि लेव्हल 2 ADAS उपलब्ध आहे.

भारतातील ADAS असलेल्या गाड्या :

महिंद्रा अँड महिंद्रा ही भारतातील पहिली कंपनी होती, जिने मास मार्केट गाड्यांमध्ये ADAS सादर केले.

आज खालील गाड्यांमध्ये ADAS उपलब्ध आहे

महिंद्रा XUV700, टाटा हॅरियर-सफारी, एमजी एस्टर-हेक्टर, टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, ह्युंदाई व्हर्ना-टूसॉन, किया सेल्टॉस-सोनेट, होंडा सिटी-एलिव्हेट आदी.

ADAS बाजारपेठेचा विस्तार

क्रिसिलच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारतातील ADAS बाजारपेठ सुमारे 16.9 कोटी डॉलर इतकी होती. 2028 पर्यंत हा बाजार 1 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या ADAS असलेल्या पॅसेंजर कार्सचा वाटा एकूण विक्रीत केवळ 2% असला, तरी पुढील पाच वर्षांत कॉम्पॅक्ट आणि मिड-सेगमेंटमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे.

निष्कर्ष

ADAS ही लक्झरी नाही, तर हळूहळू गरज बनत आहे.
मात्र, गाडी घेताना केवळ “ADAS आहे” एवढे पाहणे पुरेसे नाही.
“ADAS कोणत्या लेव्हलचे आहे आणि ते कसे काम करते?”
हा प्रश्न विचारणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे.

(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक व मुक्त पत्रकार आहेत.)