India first sodium ion battery Pune startup : सध्याच्या काळात विजेशिवाय आयुष्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. त्यातही मोबाईलपासून ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत आपण सर्वजण लिथियम-आयन बॅटऱ्यांनी वेढलेलो आहोत. मात्र, यासाठी परदेशी आयातीवर अवलंबून राहावे लागते. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या एका जोडप्याने देशातील पहिली सोडियम-आयन बॅटरीची निर्मिती केली आहे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने ही मोठी झेप मानली जात आहे. डीप-टेक स्टार्टअप ‘रिचार्जियन एनर्जी’ने १ किलोवॅट-अवर (1 kWh) क्षमता असलेली ही बॅटरी विकसित केली आहे.
‘एनर्जी एफिशिएन्सी समिट २०२६’च्या प्लॅटफॉर्मवर ही बॅटरी सादर करण्यात आली होती. सध्या ही स्वदेशी ‘सोडियम आयन’ बॅटरी हैदराबाद येथील सीआयआयच्या गोदरेज ग्रीन बिजनेस सेंटरमध्ये सोलर पॅनेलसाठी वापरण्यात येत आहे.
काय आहे या भारतीय तंत्रज्ञानाची खासियत?
हैदराबादमधील सीआयआय-गोदरेज ग्रीन बिजनेस सेंटरच्या छतावर बसवलेल्या सोलर पॅनेल्सद्वारे निर्माण होणारी वीज थेट या १ किलोवॅट-अवर क्षमतेच्या सोडियम-आयन बॅटरीत साठवली जात आहे. यानंतर, याच बॅटरीच्या ऊर्जेवर सेंटरच्या बाहेर असलेला एका मोठ्या डिस्प्लेला वीज पुरवठा केला जातो. ही स्वतंत्रपणे चालणारी ऑफ-ग्रिड सिस्टीम आहे. या तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, बॅटरीतून पुढे वीज प्रवाहित करण्यासाठी करंटला डीसी मधून एसीमध्ये बदलण्याची गरज नाही. करंटचा फॉर्म न बदलल्यामुळे ऊर्जेचे होणारे नुकसान जवळपास नगण्य झाले आहे.
लिथियमपेक्षा सोडियम बॅटरी का सरस?
भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर लिथियमच्या तुलनेत सोडियमचे अनेक मोठे फायदे आहेत. लिथियमचे साठे मर्यादीत असून भारतासारख्या देशांना यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. याउलट भारतात मीठाची काहीच कमतरता नाही. हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला तर आयातीची गरज संपुष्टात येऊन देशातच निर्मिती शक्य आहे. तीव्र उष्णतेमध्ये लिथियम बॅटरीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. सोडियम बॅटरी भारतासारख्या कडक उन्हाळा आणि हिवाळा असलेल्या वातावरणातही पूर्ण क्षमतेने कार्य करण्यास सक्षम आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कच्चा माल स्वस्त मिळत असल्याने या बॅटरीची किंमतही लिथियमच्या तुलनेत खूपच कमी असेल.
संशोधक पती-पत्नीचा शोध
या नाविन्यपूर्ण प्रकल्पामागे पुण्याच्या रिचार्जियन एनर्जी या स्टार्टअपची मोठी मेहनत आहे. याची पायाभरणी २०२१ मध्ये संशोधक पती-पत्नी डॉ. विलास शेळके आणि डॉ. मंजूषा शेळके यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून केली. लॅबपासून सुरू झालेला हा प्रवास अत्यंत वेगाने प्रत्यक्षात उतरला. २०२४ मध्ये कंपनीने भारतातील पहिली सोडियम-आयन सेल तयार करणारी पायलट फॅक्टरी सुरू केली. त्यानंतर २०२५ मध्ये कडक सुरक्षा निकषांवर आधारित ‘एआरएआय’ (ARAI) चे व्हॅलिडेशन टेस्ट पास करून या टीमने नवा इतिहास रचला.
