India Social Media Law Changes Safe Harbour Protection: माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने देशाच्या सोशल मीडिया कायद्यांमध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि एक्ससारख्या प्लॅटफॉर्मना त्यांच्या युजर्सनी पोस्ट केलेल्या कंटेंटसाठी मिळणारे कायदेशीर संरक्षण काढून घेण्याच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. या बदलांच्या चर्चेबाबत माहिती मिळाल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
या निर्णयामुळे भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांच्या कार्यपद्धतीत बदल होऊ शकतो. जगातील काही सर्वात मोठ्या इंटरनेट कंपन्यांच्या व्यवसाय मॉडेलमध्ये हे संरक्षण केंद्रस्थानी असल्याने, सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘सेफ हार्बर’ संरक्षण संपणार?
या चर्चेचा मुख्य मुद्दा म्हणजे ‘सेफ हार्बर’ या कायदेशीर संरक्षणाच्या नियमांमध्ये बदल करण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या या नियमानुसार सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर युजर्सनी पोस्ट केलेल्या मजकुरासाठी थेट जबाबदार धरले जात नाही. मात्र, युजर्सना कोणता कंटेंट दाखवायचा, हे सोशल मीडिया कंपन्या स्वतः ठरवतात. त्यामुळे अशा कंपन्यांना मिळणारे कायदेशीर संरक्षण कमी करावे का, याचा सरकार विचार करत आहे.
हे संरक्षण केवळ इंटरनेटवरील माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणाऱ्या सेवांनाच द्यावे का, याचीही तपासणी सुरू आहे. यामध्ये इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, दूरसंचार कंपन्या आणि पीअर-टू-पीअर मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा समावेश होऊ शकतो.
युजर्सच्या कंटेंटवर कंपन्यांचे नियंत्रण
सरकारच्या मते, सोशल मीडिया कंपन्यांना आता केवळ माहिती पोहोचवणारे माध्यम मानता येणार नाही. कारण फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्ससारखे प्लॅटफॉर्म कोणत्या पोस्ट युजर्सना दाखवायच्या, कोणत्या पोस्टला अधिक प्रसिद्धी द्यायची आणि कोणत्या पोस्टचा प्रसार रोखायचा, हे अल्गोरिदमच्या मदतीने ठरवतात.
याशिवाय, या कंपन्या स्वतःची कम्युनिटी गाइडलाइन्स तयार करून पोस्टवर नियंत्रण ठेवतात. मात्र, या नियमांचा भारतीय कायद्यांशी नेहमीच मेळ बसेल असे नाही. त्यामुळे सोशल मीडिया कंपन्या कंटेंटवर नियंत्रण ठेवत असतील, तर त्यांना इतर इंटरनेट मध्यस्थांप्रमाणेच कायदेशीर संरक्षण का द्यावे, असा प्रश्न सरकारमधील एका गटाने उपस्थित केला आहे.
‘सेफ हार्बर’ म्हणजे काय?
“पूर्वी सोशल मीडिया आणि इंटरनेट प्लॅटफॉर्मचे काम केवळ एका व्यक्तीचा मेसेज दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यापुरते मर्यादित होते. त्यामुळे युजर्सनी पोस्ट केलेल्या कंटेंटसाठी या प्लॅटफॉर्मना जबाबदार धरले जात नव्हते. यालाच ‘सेफ हार्बर’ अंतर्गत कायदेशीर संरक्षण म्हटले जाते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. सोशल मीडिया कंपन्या युजर्सचा सहभाग वाढवण्यासाठी आणि पोस्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष अल्गोरिदमचा वापर करतात”, असे असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
या अधिकाऱ्याने पुढे म्हटले, “एवढेच नाही, तर कोणती पोस्ट युजर्सना दिसावी आणि कोणती पोस्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, हेही प्लॅटफॉर्म ठरवतात. त्यामुळे या कंपन्या आता केवळ मेसेज पोहोचवणारे माध्यम राहिलेल्या नाहीत, तर कंटेंटच्या प्रसारावरही त्यांचे नियंत्रण आहे.”
