Indian Car Market Share : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर २०२६) प्रवासी वाहने क्षेत्रात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी ‘मारुती सुझुकी’ने जोरदार पुनरागमन करत भारतीय वाहन बाजारात ४० टक्क्यांहून मार्केट शेअर मिळवत पहिलं स्थान मिळवलं आहे, तर टाटा मोटर्सनेही जोरदार मुसंडी मारत महिंद्रा अँड महिंद्राला मागे टाकत दुसरे स्थान पटकावलं आहे.
ह्युंदाई ह्युंदाई मोटर इंडियाची घसरण
एका बाजूला मारुती सुझुकी आणि टाटा मोटार्सने चांगली कामगिरी केली आहे, तर दुसरीकडे दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई मोटर इंडियाच्या बाजारातील हिश्श्यात घसरण झाली आहे. ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या काळात देशांतर्गत प्रवासी वाहनांची एकूण विक्री २८.३ टक्क्यांनी वाढून २६,३७,०६७ युनिट्स झाली आहे, जी गेल्या वर्षी याच काळात २०,५५,१२२ युनिट्स होती.
मारुती सुझुकीचं दमदार पुनरागमन
या तेजीच्या लाटेत मारुती सुझुकीचा बाजारातील हिस्सा ३८.७१ टक्केवरून वाढून ४०.९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामध्ये २.२५ टक्के गुणांची मोठी झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात एसयूव्ही क्षेत्रातील तगड्या स्पर्धेमुळे मारुतीचा हिस्सा ३९.२६ टक्क्यांपर्यंत घसरला होता. मात्र, यावर काम करत कंपनीने हॅचबॅक विभागावर लक्ष केंद्रीत केलं आणि नव्या ‘ब्रेझा’ आणि ‘बलेनो’ सारख्या मॉडेल्सच्या मजबूत मागणीमुळे मारुतीने आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.
आम्ही एसयूव्ही विभागासोबतच लहान कार आणि सीएनजी पोर्टफोलिओमध्येही आपली पकड मजबूत केली आहे. निर्मिती वाढल्याने वाहनांची उपलब्धता सुधारली आणि त्याचा थेट फायदा विक्रीत झाल्याची प्रतिक्रिया मारुती सुझुकी वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी दिली.
टाटा मोटर्सची मोठी झेप; महिंद्रा व ह्युंदाईची घसरण
टाटा मोटर्स कंपनीने आपला मार्केट शेअर १३.३२ टक्के वरून १४.८२ टक्के वर नेला आहे. टियागो, पंच तसेच ईव्ही आणि सीएनजी वाहनांच्या दमदार मागणीच्या जोरावर टाटाने ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले. महिंद्राचा बाजारातील हिस्सा १४.४८ टक्क्यांवरून घसरून १३.५८ टक्के वर आला आहे, ज्यामुळे कंपनी तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. दक्षिण कोरियन कार उत्पादक ह्युंदाईला मोठा फटका बसला असून त्यांचा हिस्सा १३.२२ टक्क्यांवरून थेट ११.५७ टक्के वर घसरला आहे. कियाने मात्र आपला हिस्सा ६.४० टक्के कायम ठेवला आहे.
जपानी व भारतीय कंपन्यांचे वर्चस्व
मारुती सुझुकीच्या जोरावर जपानी कार उत्पादकांचा एकत्रित बाजारातील हिस्सा ४९.४५ टक्के वर पोहोचला आहे. यात टोयोटा (६.५६ टक्के) आणि होंडा (१.१५ टक्के) यांचा हिस्सा काहीसा घटला आहे, पण त्याचवेळी निसानने आपली कामगिरी सुधारत ०.७७ टक्के हिस्सा मिळवला आहे.
दुसरीकडे, टाटा, महिंद्रा आणि फोर्स मोटर्सच्या बळावर भारतीय कंपन्यांचा बाजारातील एकत्रित हिस्सा २७.८४ टक्क्यांवरून वाढून २८.४७ टक्के झाला आहे. युरोपियन ब्रँड्ससाठी (फॉक्सवॅगन, स्कोडा, रेनॉल्ट, स्टेलांटिस) हा काळ आव्हानात्मक राहिला असून त्यांचा एकत्रित हिस्सा ३.६८ टक्क्यांवरून घसरून ३.०५ टक्के वर आला आहे.
