AI Impact on IT Jobs Indian Companies Bench Policy explained: भारतीय आयटी कंपन्यांना आता मोठ्या प्रमाणात राखीव कर्मचारी ठेवण्याची गरज भासणार नाही, कारण कंपन्या बदलत्या कौशल्यांच्या, विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या कार्यपद्धतीत बदल करत आहेत. आयटी उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या मते, ‘बेंच’ म्हणून ओळखले जाणारे राखीव कर्मचारी मोठ्या संख्येने नियुक्त करण्याचे आणि त्यांना कायम ठेवण्याचे पारंपरिक मॉडेल वेगाने कालबाह्य होत आहे. याबाबत बिझनेस स्टँडर्डने वृत्त दिले आहे.
अलीकडच्या काही वर्षांत, इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझंट आणि टेक महिंद्रा यांसारख्या कंपन्यांनी आपला कर्मचारी वापर दर अंदाजे ८५% ठेवला आहे, तर एका दशकापूर्वी तो ७०% च्या आसपास होता. नफा टिकवून ठेवण्यासाठी, कंपन्या जवळपास सर्व उपलब्ध संसाधने ग्राहकांच्या प्रकल्पांवर नियुक्त करत आहेत आणि कमीत कमी राखीव कर्मचारी (बेंच) संख्या राखत आहेत.
टीमलीज डिजिटलच्या सीईओ नीती शर्मा म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांत सरासरी बेंच टाइम सुमारे ९० दिवसांवरून केवळ ४५ दिवसांपर्यंत कमी झाला आहे.
“राखीव कर्मचारी ठेवल्याने खर्च वाढतो आणि बहुतेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना एआयमध्ये कोणत्या गोष्टींचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, हे शोधत आहेत. जर तुम्ही बेंच ठेवला, तर ती कौशल्ये कदाचित संबंधित राहणार नाहीत”, असे शर्मा यांनी बिझनेस स्टँडर्ड या संकेतस्थळाला सांगितले.
“मागणी पुन्हा वाढली तरीही ही पातळी वाढेल असे मला वाटत नाही, कारण जसजसे अधिक लोक एजेंटिक आणि जेन एआयमध्ये प्रशिक्षित होतील, तसतसे कंपन्यांना अतिरिक्त मनुष्यबळाची गरज भासणार नाही”, असेही त्या पुढे म्हणाल्या.
दरम्यान, आयटी उद्योगक्षेत्र दीर्घकाळ चाललेल्या मंदीशीही झुंजत आहे. नॅसकॉमच्या मते, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये आयटी क्षेत्रात केवळ ५.१% वाढ होण्याचा अंदाज आहे आणि आर्थिक वर्ष २०२६ मध्येही असेच ट्रेंड अपेक्षित आहेत.
आयटी क्षेत्रात बेंचिंग म्हणजे काय?
आयटी सेवा उद्योगात, बेंचिंग म्हणजे असा कालावधी असतो जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला कोणत्याही क्लायंटच्या प्रोजेक्टवर नेमले जात नाही, परंतु तो कंपनीच्या पगारावर कायम असतो. बेंचवर असताना, कर्मचारी नवीन अंतर्गत कामे करू शकतात किंवा आपले कौशल्य वाढवू शकतात.
आयटी सेवांसारख्या प्रोजेक्ट-आधारित कामाच्या वातावरणात बेंचिंग सामान्य आहे, जिथे क्लायंटच्या करारांनुसार मागणीत चढ-उतार होतो. यामुळे कंपन्यांना कमी मागणीच्या काळात कुशल कामगारांना टिकवून ठेवता येते. पण, दीर्घकाळ बेंचवर राहिल्याने उत्पादकता, पगाराचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य यांबाबत चिंता निर्माण होऊ शकते.
