Indian IT Sector AI Impact : आर्टिफिशियल इंटेलिजन्स आयटी क्षेत्रातील कंपन्यांसाठी दुधारी शस्त्र ठरताना दिसत आहे. एकीकडे एआय (AI) शी संबंधित प्रकल्पांमधून नवीन संधी उपलब्ध होत आहेत तर, दुसरकीडे पारंपरिक आयटी सेवा व्यवसायावर मोठा आर्थिक ताण येत आहे. यात भारतीय आयटी कंपन्या सर्वाधिक भरडल्या जात असल्याचे चित्र समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’ या ब्रोकरेज फर्मने धोकादायक इशारा दिला आहे.
पारंपरिक IT सेवांना AI चा फटका का बसतोय?
भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या स्वस्त मनुष्यबळ आणि मोठ्या परदेशी कंपन्यांना सेवा पुरवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसारख्या अनेक कामांचा समावेश आहे. कोटकच्या अहवालानुसार, जनरेटिव्ह एआयच्या वापरामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम आता चुटकीसरशी होत आहे. एआयने केवळ कामाचा वेग वाढवला नाही तर कार्यक्षमता सुधारली आहे. परिणामी ‘टाइम अँड मटेरियल’ करारांतर्गत पूर्वी मानवी तासांवर होणारे बिलिंग आता कमी झाले आहे. ‘फिक्स्ड-प्राइज’ प्रकारच्या मॅनेज्ड सर्व्हिसेस करारांमध्ये ग्राहकांकडून दर कमी करण्यासाठी मोठा दबाव आणला जात आहे. याचा थेट परिणाम कंपन्यांच्या महसूलावर होत आहे.
मोठ्या कंपन्यांवर अधिक ताण, मिड-कॅप कंपन्या सावरल्या
या बदलत्या तंत्रज्ञानाचा फटका टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएलटेक यांसारख्या आघाडीच्या आयटी कंपन्यांना जास्त बसत आहे. कारण त्यांच्या महसुलाचा मोठा हिस्सा पारंपरिक सेवांवर अवलंबून आहे. याउलट, पर्सिस्टंट सिस्टीम्स, हेक्सावेअर आणि कोफोर्ज या मध्यम आकाराच्या कंपन्यांनी नवीन धोरण स्वीकारत बाजारातील हिस्सा वाढवून हा दबाव कमी करण्यात यश मिळवले आहे.
AI मधील महसूल वाढतोय, पण…
टीसीएसने (TCS) २.६ अब्ज डॉलर्सचा (वार्षिक आधारावर) एआय (AI) संबंधित महसूल नोंदवला, ज्यामध्ये अमेरिकन डॉलरच्या मूल्यानुसार तिमाही वाढ १३.६% झाली आहे. एचसीएलटेकने ६८.८ कोटी डॉलर्सचा प्रगत एआय महसूल नोंदवला, ज्यात तिमाही वाढ १०.६% नोंदवली; तर इन्फोसिसच्या एकूण महसुलात एआय महसुलाचा वाटा ८.२% असून, गेल्या काही तिमाहींमध्ये त्यात वेगाने वाढ झाली आहे. AI क्षेत्रातील हा सकारात्मक बदल असला, तरी जुन्या पारंपरिक व्यवसायात होणाऱ्या घसरणीची भरपाई करण्यासाठी AI मधील ही उत्पन्नवाढ सध्या अपुरी ठरत असल्याचे कोटकने नमूद केले आहे.
नोकरकपात आणि खर्च कपातीमुळे नफा टिकून
महसूल वाढ मंदावली असली, तरी कंपन्यांनी कठोर खर्च कपात करून आपला नफा टिकवून ठेवला आहे. कर्मचाऱ्यांची पगारवाढ लांबणीवर टाकणे, व्हेरिएबल पे कमी करणे, नोकरकपात आणि कडक खर्चाचे नियम यांद्वारे नफा सांभाळला जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याचा फायदाही भारतीय आयटी कंपन्यांना आपोआप मिळत आहे.
