Infosys CEO Salil Parekh AI Statement : सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयची लाट सुरू आहे. याचा सर्वात मोठा धक्का भारतीय आयटी कंपन्यांना बसला आहे. दिग्गज आयटी कंपन्यांपासून स्टार्टअप्सपर्यंत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात पाहायला मिळत आहे. परिणामी पारंपारिक माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्राचे सुवर्णदिवस संपले अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक सलिल पारेख यांनी AI वर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
AI सेवांमधून मिळणारा महसूल ८ टक्क्यांच्या पार
एआय लाटेचा भारतीय आयटी कंपन्यांवर नक्कीच विपरित परिणाम झाला आहे. मात्र, पारेख यांच्या मते, सध्याचा काळ हा खऱ्या अर्थाने एआय विस्ताराची सुरुवात आहे. इन्फोसिसच्या एकूण व्यवसायात एआय आधारित सेवांचा वाटा आता ८ टक्क्यांहून अधिक झाला आहे. गेल्या काही तिमाहींपासून या विभागातून मिळणारा महसूल दुहेरी अंकात वाढत आहे. कंपनी सध्या AI एजंट्स, ॲप्लिकेशन मॉडर्नायझेशन आणि कोडिंग टूल्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर वेगाने काम करत आहे.
मोठ्या कंपन्यांना इन्फोसिससारख्या कंपन्यांची गरज
आर्टिफिशियल इंटेलिजन्सनंतर प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानात वेगाने बदल आहे. खासकरुन मोठ्या कंपन्या जेव्हा नवीन फाउंडेशन मॉडेल्स स्वीकारतात, तेव्हा त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप आणि डेटा समजून घेण्यासाठी आमच्यासारख्या तंत्रज्ञान भागीदारांची गरज नेहमीच भासणार असल्याचे सलिल पारेख यांनी स्पष्ट केलं.
भारतीय आयटी उद्योग जिवंत आहे : सलील पारेख
एआय आणि बदलत्या तंत्रज्ञानामुळे भारतीय आयटी कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याच्या चर्चांनाही पारेख यांनी पूर्ण विराम दिला. “भारतीय आयटी उद्योग ‘भारतीय आयटी उद्योग पूर्णपणे जिवंत आहे,” असा विश्वास व्यक्त करत, आगामी काळात कृत्रिम प्रज्ञा (AI) हेच या क्षेत्राच्या आणि इन्फोसिसच्या दीर्घकालीन वाढीचे सर्वात मोठे इंजिन ठरेल, असंही पारेख म्हणाले.
आशीष कुमार दास सांभाळणार इन्फोसिसची धुरा
इन्फोसिस सध्या एका नव्या टप्प्यात प्रवेश करत असून कंपनीने नेतृत्व बदलाची मोठी घोषणा केली आहे. सलिल पारेख यांचा दुसरा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, १ एप्रिल २०२७ पासून कंपनीचे ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ अधिकारी आशीष कुमार दास इन्फोसिसचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून पदभार स्वीकारतील.
शेअर बाजारात आयटी क्षेत्राची कामगिरी
जुलै महिन्यात ‘निफ्टी आयटी’ निर्देशांकात तब्बल १९% ची वाढ नोंदवली गेली. गेल्या १३ वर्षांतील ही सर्वोत्तम मासिक कामगिरी मानली जात असून या काळात इन्फोसिसचा शेअर १५ टक्क्यांनी वधारला आहे. सध्या इन्फोसिसचा शेअर १,१५३.३० च्या आसपास व्यवहार करत आहे.
