Infosys CEO Salil Parekh Salary Growth: इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलिल पारेख यांना आर्थिक वर्ष २०२६ मध्ये एकूण ८२.६० कोटी रुपयांचे मानधन मिळाले आहे. या मानधनामध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे २ टक्क्यांची वाढ झाली आहे. याबाबत कंपनीच्या वार्षिक अहवालात माहिती देण्यात आली आहे. ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात, पारेख यांचे मानधन हे इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगारापेक्षा ७४२ पट आहे.

सलिल पारेख यांच्या पगाराविषयी

शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या इन्फोसिसच्या वार्षिक अहवालानुसार, सलिल पारेख यांनी आर्थिक वर्ष २०२६ (FY26) दरम्यान ८.५ कोटी रुपये इतका निश्चित पगार मिळाला. यामध्ये ७.९७ कोटी रुपयांच्या मूळ पगाराचा आणि ०.५३ लाखांच्या निवृत्ती लाभांचा समावेश होता.

निश्चित वेतनाव्यतिरिक्त, सलिल पारेख यांना व्यवसायाची कामगिरी आणि नेतृत्वाशी संबंधित उद्दिष्टांवर आधारित बोनस, प्रोत्साहन भत्ता आणि इतर मोबदल्यांच्या स्वरूपात २३.३५ कोटी रुपये मिळाले.

पण, त्यांच्या एकूण पगार पॅकेजचा सर्वात मोठा भाग हा ‘स्टॉक-आधारित मोबदल्या’च्या (stock-based compensation) स्वरूपात होता. या वर्षात वापरण्यात आलेल्या ‘स्टॉक ऑप्शन्स’चे मूल्य ५०.७५ कोटी रुपये इतके होते. हे मूल्य या आर्थिक वर्षातील त्यांच्या एकूण कमाईच्या ६० टक्क्यांहून अधिक होते.

इन्फोसिसने स्पष्ट केले की, स्टॉक-संबंधित हा मोबदला कंपनीच्या ‘२०१५ च्या स्टॉक प्रोत्साहन योजने’अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या २,७२,४०० ‘प्रतिबंधित स्टॉक युनिट्स’च्या (RSUs) आणि ‘२०१९ च्या योजने’अंतर्गत जारी करण्यात आलेल्या ६४,६९० RSUs च्या वापरामुळे (Exercise) मिळाला आहे.

सलिल पारेख यांना आर्थिक वर्ष २५ (FY25) मध्ये एकूण ८०.६२ कोटी रुपये पगार मिळाला होता. कंपनीने नमूद केले की, मागील वर्षाच्या एकूण पगाराच्या आकडेवारीत आर्थिक वर्ष २५ दरम्यान वापरल्या गेलेल्या ‘स्टॉक इन्सेंटिव्ह्ज’चे मूल्य समाविष्ट नव्हते.

सर्वाधिक पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश

भारताच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सलिल पारेख यांचे स्थान कायम आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, त्यांच्या मानधनात २१.६ टक्क्यांची वाढ झाली होती. ज्यामुळे भारतीय आयटी उद्योगातील सर्वाधिक वेतन घेणारे ते दुसरे अधिकारी ठरले होते.

जानेवारी २०१८ मध्ये इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून, सलिल पारेख यांनी इन्फोसिसला सातत्यपूर्ण वाढ, मोठ्या करारांमधील यश, डिजिटल सेवांचा विस्तार आणि जागतिक ग्राहकांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित वाढता वापर अशा एका महत्त्वपूर्ण कालखंडातून यशस्वीपणे पुढे नेले आहे.

कोण आहेत सलिल पारेख?

सलिल पारेख हे दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. Infosys मध्ये रुजू होण्यापूर्वी, त्यांनी आयटी क्षेत्रातील दिग्गज फ्रेंच कंपनी असलेल्या Capgemini मध्ये २५ वर्षांची कारकीर्द घडवली. तिथे त्यांनी ‘ग्रुप मॅनेजमेंट बोर्ड’वर काम केले होते. त्यापूर्वी, त्यांनी Ernst & Young मध्ये ‘पार्टनर’ म्हणूनही काम केले होते. त्यांनी IIT Bombay मधून ‘एरोनॉटिकल इंजिनिअरिंग’मध्ये B.Tech पदवी प्राप्त केली असून, Cornell University मधून ‘कॉम्प्युटर सायन्स’ आणि ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’ या विषयांमध्ये पदव्युत्तर पदव्या संपादन केल्या आहेत. याबाबत आयआयटी बॉम्बेच्या संकेतस्थळावर उल्लेख आहे.