Infosys Hiring 20000 Freshers In 2027: माहिती तंत्रज्ञान (आयटी) सेवा क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस आर्थिक वर्ष २०२७ मध्ये २०,००० महाविद्यालयीन पदवीधरांची भरती करणार आहे, असे कंपनीचे सीईओ सलिल पारेख यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने सांगितले. कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) वाढीच्या संधी दिसत असलेल्या क्षेत्रांकडे वळत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

“१ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत इन्फोसिस आणखी २०,००० महाविद्यालयीन पदवीधरांची भरती करणार आहे. कंपनीने याचा आधीच आपल्या योजनेत समावेश केला आहे”, असे पारेख यांनी मनीकंट्रोल या संकेतस्थळाला सांगितले.

आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तीन तिमाहींत, इन्फोसिसने १८,००० महाविद्यालयीन पदवीधरांची भरती केली आहे, तर गेल्या तिमाहीत (तिसरी तिमाही, आर्थिक वर्ष २६) तिच्या एकूण कर्मचारी संख्येत ५,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२६ च्या अखेरीस कंपनी २०,००० महाविद्यालयीन पदवीधरांची भरती करण्याची अपेक्षा करत आहे.

पारेख यांनी पुढे सांगितले की, पारंपरिक कामाच्या काही भागांवर दबाव येत असतानाही इन्फोसिसला कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) संधी दिसत आहेत.

“आम्हाला काही ठिकाणी घट आणि काही ठिकाणी वाढ दिसत आहे. आम्हाला घट दिसण्यापेक्षा वाढ थोडी जास्त दिसत आहे”, असे ते म्हणाले.

इन्फोसिसच्या सीईओंनी सांगितले की, एआय एजंट्सचा वाढता अवलंब आणि विविध फाउंडेशन मॉडेल्सच्या वापरामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सॉफ्टवेअर विकास, ग्राहक सेवा आणि जुन्या ॲप्लिकेशन्सच्या आधुनिकीकरणामध्ये नवीन सेवांची मागणी निर्माण करत आहे.

“सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे उदाहरण घेतल्यास, जिथे विविध फाउंडेशन मॉडेल्सवर अनेक (एआय) एजंट्स विकसित केले जात आहेत. जुने लेगसी ॲप्लिकेशन्स असतात आणि एजंट्सचा वापर करून त्यांचे आधुनिकीकरण कसे करायचे, यावर काम सुरू आहे”, असे पारेख म्हणाले. कंपनीला सध्याच्या कामात काही प्रमाणात घट दिसत असली तरी ही कामाची नवीन क्षेत्रे उदयास येत आहेत, असेही त्यांनी पुढे सांगितले.

२५ डिसेंबर रोजी मनीकंट्रोलने एका विशेष वृत्ताद्वारे माहिती दिली होती की, इन्फोसिस कंपनीने फ्रेशर्ससाठी सुरुवातीचे वेतन वाढवले आहे. एआय-फर्स्ट क्षमता मजबूत करण्यासाठी आणि डिजिटल कौशल्ये असलेल्या प्रतिभावंतांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने कंपनी विशेष तंत्रज्ञान पदांसाठी वार्षिक २१ लाख रुपयांपर्यंतचे पगार पॅकेज देत आहे.