iPhone 17pro: स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ॲपलने ९ सप्टेंबर रोजी आयफोन १८ प्रो (iPhone 18 Pro), आयफोन १८ प्रो मॅक्स (iPhone 18 Pro Max) आणि आपला पहिलाच फोल्डेबल फोन ‘आयफोन ड्युओ’ (iPhone Duo) लाँच केले. जागात मेमरी चिप्सचा तुटवडा आणि सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता लाँच इव्हेंटनंतर ॲपलने आपल्या नवीन आणि सध्या बाजारात असलेल्या सर्वच आयफोन मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत.
भारत आणि जगभरातील ॲपल स्टोअर्सवर आयफोनच्या किमतींमधील हा बदल लागू करण्यात आला आहे. यामध्ये आयफोन १७, आयफोन एअर, आयफोन १७ ई आणि आयफोन १६ यांसारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. नव्या किमतींनुसार, भारतातील ग्राहकांना सध्या बाजारात असलेल्या आणि नव्याने लाँच झालेल्या मॉडेल्ससाठी २० ते ४० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार आहे.
कोणत्या मॉडेल्सच्या किमती वाढल्या?
किमतीतील बदलांनंतर आयफोन १७ ची किंमत ८२,९०० रुपयांवरून वाढून ९९,९०० रुपये झाली आहे. iPhone Air ची किंमत आता १,१९,९०० रुपयांवरून वाढून १,४९,९०० रुपये झाली आहे. नवीन मॉडेल्सचा विचार करता, iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max अनुक्रमे १,६४,९०० रुपये आणि १,७९,९०० रुपये या किमतीत लाँच करण्यात आले आहेत. ही किंमत मागील मॉडेल्सच्या तुलनेत ३०,००० रुपयांहून अधिक आहे.
‘आयफोन ड्युओ’ची भारतातील किंमत
दुसरीकडे, अमेरिकेच्या तुलनेत भारतात नवीन ‘आयफोन ड्युओ’च्या (iPhone Duo) किमतीतही मोठी वाढ करण्यात आली आहे. भारतात या फोल्डबल फोनची किंमत २,९९,९०० रुपये आहे, तर अमेरिकेत ती सुमारे १,९०,१६४ रुपये इतकी आहे. त्यामुळे, अमेरिकेच्या तुलनेत भारतात यासाठी जवळपास ५८ टक्के अधिक किंमत मोजावी लागत आहे.
ॲपल आणि भारत
ॲपलने फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि टाटा समूह यांसारख्या असेंब्ली भागीदारांच्या मदतीने भारतात आयफोनची असेंब्ली मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. विविध वृत्तांनुसार ॲपलने २०२५ मध्ये भारतात अंदाजे ५ कोटी ५० लाख आयफोन्स असेंबल केले आहेत.आयफोन असेंब्लीसाठी तामिळनाडूमध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा नवीन प्रकल्प उभारून कंपनी आपली क्षमता वाढवत आहे. तसेच, गेल्या वर्षी बंगळुरूमध्ये फॉक्सकॉनच्या २.६ अब्ज डॉलर्सच्या प्रकल्पातही प्राथमिक कामकाज सुरू झाले आहे.
रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, ॲपलचे उद्दिष्ट २०२६ च्या अखेरीस अमेरिकेतील आयफोन उत्पादन भारतात हलवण्याचे आणि येथून दरवर्षी ६ कोटींहून अधिक आयफोन्सची निर्यात करण्याचे आहे. भारत सरकारही ॲपलला केवळ असेंब्लीपुरते मर्यादित न राहता सुटे भाग तयार करण्याच्या दिशेने पावले उचलण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
