iPhone Price Hike 2027 Apple Samsung Memory Chip Cost Increase: ॲपलने जागतिक स्तरावर आयफोन १८ प्रो (iPhone 18 Pro) सिरीजच्या किमतीत मोठी वाढ केली असून, प्रमुख बाजारपेठांपैकी भारतात किमतींमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. आयफोन १८ प्रो मॉडेल्ससोबतच, ॲपलने आयफोन १७, आयफोन एअर आणि आयफोन १६ यांसारख्या जुन्या मॉडेल्सच्या किमतीही वाढवल्या आहेत. आता, ताज्या वृत्तांनुसार ॲपल पुढील वर्षी आणखी एकदा किमती वाढवण्याची शक्यता आहे.

‘डिजीटाइम्स’च्या वृत्तानुसार ॲपलने DRAM आणि NAND स्टोरेजच्या मेमरी चिप्ससाठी सॅमसंगसोबत करार केला आहे. मात्र, सॅमसंगने मेमरी चिप्सच्या किमती वाढवल्या आहेत. याचा अर्थ ॲपलला DRAM आणि NAND साठी अधिक किंमत मोजावी लागेल. आता या वाढलेल्या खर्चाचा बोजा कालांतराने ग्राहकांवर पडू शकतो आणि परिणामी २०२७ मध्ये आयफोनच्या किमती पुन्हा वाढू शकतात.

२०२७ पासून आयफोन्समध्ये वापरल्या जाणाऱ्या मेमरीसाठी ॲपलला बरीच जास्त किंमत मोजावी लागू शकते. असे म्हटले जात आहे की, २०२७ च्या पहिल्या तिमाहीपासून ॲपलला LPDDR5X रॅमसाठी प्रति जीबी २ डॉलर्स आणि NAND स्टोरेजसाठी प्रति जीबी ०.३३ डॉलर्स मोजावे लागतील. याचा अर्थ रॅमच्या किमतीत सुमारे २८ टक्के आणि NAND च्या किमतीत २७ टक्के वाढ होणार आहे.

त्यामुळे जर आपण १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या आयफोनच्या मेमरीची किंमत काढली, तर १२ जीबीसाठी २४ डॉलर्स आणि २५६ जीबीसाठी ८४.४८ डॉलर्स खर्च येईल. म्हणजेच मेमरीची एकूण किंमत १०८.४८ डॉलर्स इतकी असेल. याचा अर्थ असा की, केवळ मेमरीसाठीच ॲपलला प्रति आयफोन १०० डॉलर्सपेक्षा जास्त खर्च येऊ शकतो.

आयफोनच्या किमती आणखी वाढणार का?

वृत्तांनुसार, ॲपल पुढील वर्षी किमतीत आणखी १०० डॉलर्सची वाढ करण्याची योजना आखत असू शकते. मात्र, कंपनीने अद्याप अशा कोणत्याही वाढीला दुजोरा दिलेला नाही, त्यामुळे ही संभाव्य दरवाढ अनिश्चित आहे. भारतात आयफोन मॉडेल्सच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली आहे. आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्सच्या किमतीत तब्बल ३०,००० रुपयांची मोठी वाढ झाली आहे.

भारतात आयफोन १७ च्या किमतीत १७,००० रुपयांची वाढ झाली आहे, तर iPhone Air च्या किमतीत ४१ टक्क्यांपर्यंतची मोठी वाढ दिसून आली आहे. आता, पुढील वर्षी आयफोन १८ आणि iPhone Air 2 लाँच होणार असल्याने, किमतींच्या बाबतीत ॲपलवर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे.