JSW AmpStar electric truck bus launch : भारताच्या व्यावसायिक वाहन क्षेत्रातील विद्युतीकरणाला (इलेक्ट्रिक मोबिलिटी) गती देण्यासाठी जेएसडब्ल्यू (JSW) समूहाने Ampstar हा नवाकोरा ब्रँड मंगळवारी अधिकृतपणे जाहीर केला आहे. या ब्रँडअंतर्गत अत्याधुनिक इलेक्ट्रिक ट्रक आणि बसची निर्मिती केली जाणार असून, केवळ वाहनांची विक्री न करता चार्जिंग, बॅटरी बदलण्याची यंत्रणा, सुलभ वित्तपुरवठा आणि आजीवन देखभाल सेवेची संपूर्ण परिसंस्था ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल आणि पार्थ जिंदाल यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगर येथे अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प उभारण्यात आला आहे. अवघ्या १६ महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प उभा राहिला असून, यादरम्यान दरवर्षी तब्बल १५ हजार इलेक्ट्रिक ट्रक आणि बस तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
परदेशी तेलावरील अवलंबित्व घटणार
सज्जन जिंदाल यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, भारत आपल्या गरजेपैकी तब्बल ९० टक्के कच्चे तेल आयात करतो. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती आणि भू-राजकीय घडामोडींचा आपल्या अर्थव्यवस्थेवर थेट ताण पडतो. भारताकडे सूर्यप्रकाश, पवनऊर्जा, जलविद्युत आणि भविष्यात अणुऊर्जेचीही अफाट क्षमता आहे. देशांतर्गत उपलब्ध असलेल्या या हरित ऊर्जेचा वापर वाहतूक क्षेत्रासाठी करून घेणे ही काळाची गरज आहे. केवळ वाहन विकणे हा आमचा उद्देश नसून, भारताच्या वाहतूक क्षेत्राचे संपूर्ण चित्र बदलणे. परदेशी इंधनावरील देशाचे अवलंबित्व कमी करणे हा यामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
४ टक्के वाहने, पण प्रदूषण तब्बल ४० टक्के!
इलेक्ट्रिक वाहनांचं महत्त्व सांगताना पार्थ जिंदाल म्हणाले की, देशातील एकूण वाहनसंख्येत ट्रक आणि बसचा वाटा केवळ चार टक्के आहे; परंतु देशातील एकूण प्रदूषण आणि तेलाच्या आयातीमध्ये याच मोठ्या वाहनांचा वाटा सुमारे ४० टक्केएवढा मोठा आहे. त्यामुळे भारताला खऱ्या अर्थाने प्रदूषणमुक्त करायचे असेल, तर केवळ दुचाकी आणि प्रवासी कारचे विद्युतीकरण पुरेसे नाही, तर ट्रक आणि बसचे जास्तीत जास्त विद्युतीकरण होणे अनिवार्य आहे.
गेल्या १६ महिन्यांत देशातील फ्लीट ऑपरेटर, कॉर्पोरेट कंपन्या आणि चालकांशी सखोल चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या आहेत. चालकांची ‘रेंज अॅन्झायटी’ (बॅटरी संपण्याची भीती) दूर करण्यासाठी ‘एमस्टार’ने अत्यंत लवचिक आणि प्रभावी पर्याय आणले आहेत.
‘एमस्टार’मध्ये आधुनिक फीचर्स
- चार्जिंगसाठी विविध पर्याय असून, बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानामुळे अवघ्या ७ मिनिटांपेक्षा कमी वेळेत वाहनची बॅटरी बदलता येईल. तसेच शून्य ते १०० टक्के नॉर्मल चार्जिंगसाठी ६० मिनिटांपेक्षा कमी वेळ लागेल.
- ग्राहकांना वाहन थेट खरेदी करण्याबरोबरच भाडेतत्त्वावर किंवा वापराच्या आधारावर (ट्रकसाठी प्रति किलोमीटर/प्रति टन आणि बससाठी प्रति प्रवासी प्रति किलोमीटर) शुल्क आकारण्याचे पर्याय मिळतील.
- डिझेलवरून इलेक्ट्रिक वाहनांकडे संक्रमण करताना ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून आजीवन देखभाल आणि प्रशिक्षित चालकांची सुविधा दिली जाईल.
छत्रपती संभाजीनगरच्या प्रकल्पात जपान, चीन, अमेरिका आणि युरोपमध्ये वापरली जाणारी अत्याधुनिक ‘पीटीडी’ प्रक्रिया भारतात प्रथमच वापरली जात आहे. यामुळे वाहनांच्या संरचनेची मजबुती तब्बल ५० टक्क्यांनी वाढणार असून ट्रकच्या केबिनसाठी स्वयंचलित उत्पादन लाइन उभारण्यात आली आहे.
कार्बन मुक्तीला मोठा हातभार
छत्रपती संभाजीनगर प्रकल्पाद्वारे तयार होणाऱ्या १५ हजार इलेक्ट्रिक वाहनांच्या संपूर्ण जीवनकाळात होणारी कार्बन डायऑक्साइडची बचत प्रचंड असणार आहे. ही बचत चक्क ५२ हजार हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या ‘जिम नॅशनल कॉर्पोरेट पार्क’कडून शोषल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या बरोबरीची असेल.
डिझेलच्या वाढत्या आणि अनिश्चित किमतींच्या फेऱ्यातून फ्लीट ऑपरेटरना बाहेर काढत, प्रति किलोमीटर चालवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी करण्याचा ‘एमस्टार’चा प्रयत्न आहे.
