Kia Syros EV Range Price Specs : इंधनाच्या सततच्या दरवाढीमुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. मात्र, अजूनही अनेक वाहनधारकांच्या मनात ईव्हीच्या रेंज, परफॉर्मन्स आणि क्षमतेविषयी शंका आहे. तुम्हीही यापैकी एक असाल तर आता बाजारात विविध कंपन्यांच्या दमदार गाड्या आल्या आहेत. देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी किया इंडियाने आज आपली दुसरी मास-मार्केट इलेक्ट्रिक वेईकल सिरॉस ईव्ही लाँच केली आहे. देशभरातील डीलरशिपच्या माध्यमातून २५,००० रुपयांमध्ये या कारचे प्री-बुकिंग सुरू झाले आहे. ५२७ किमीची जबरदस्त रेंज, लाइफटाइम बॅटरी वॉरंटी आणि अत्याधुनिक फीचर्समुळे ही गाडी ईव्ही बाजारात धुमाकूळ घालू शकते. कियाच्या नवीन गाडीमुळे टाटा-महिंद्रा कंपनीला मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे.

ईव्ही खरेदीतील ‘तीन’ मोठे अडथळे केले दूर!

ग्राहक ईव्ही खरेदी करताना प्रामुख्याने बॅटरीचे आयुष्य, गाडीची पुनर्विक्री किंमत आणि सुरुवातीचा मोठा खर्च या तीन गोष्टींचा विचार करतात. कियाने ‘सिरॉस ईव्ही’द्वारे या तिन्ही शंका सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. या गाडीसोबत लाइफटाईम हाय व्होल्टेज बॅटरी वॉरंटी, अॅश्युअर्ड बायबॅक पॉलिसी आणि बीएएएस (Battery-as-a-Service) या स्थिर फायनान्सिंग मॉडेलमुळे ग्राहकाला बॅटरीचे भाडे स्वतंत्रपणे भरता येईल, ज्यामुळे गाडीची सुरुवातीची खरेदी किंमत लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

kia syros EV

दमदार बॅटरी पर्याय आणि जलद चार्जिंग

किया सिरॉस ईव्हीमध्ये २ बॅटरीचे पर्याय देण्यात आले आहेत. ५१.४ kWh मध्ये ५२६ किमीची रेंज मिळेल. तर ४२ kWh च्या मॉडेलमध्ये ४४३ किमीची रेंज ग्राहकांना मिळणार आहे. १०० kW च्या फास्ट चार्जरच्या मदतीने ही गाडी अवघ्या ३९ मिनिटांत १०% ते ८०% पर्यंत चार्ज होऊ शकते. यात बॅटरीचे तापमान थंड करणारी ‘बॅटरी कंडिशनिंग’ सिस्टीम आणि १०.८ kW चा ऑनबोर्ड एसी चार्जर दिला आहे.

kia syros EV
किया सिरॉस ईव्ही

मजबूत प्लॅटफॉर्म आणि प्रगत पॉवर परफॉर्मन्स

किया सिरॉस ईव्ही ही कंपनीच्या मजबूत K1 प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यात वापरलेली प्रगत निकेल मँगनीज कोबाल्ट (NMC) बॅटरी सेगमेंटमध्ये सर्वोत्तम १७१ PS पॉवर जनरेट करते. ५१.४ kWh बॅटरी पॅकच्या जोरावर ही कार अवघ्या ८.१ सेकंदात ० ते १०० किमी/तास हा वेग पकडू शकते. भारतीय वातावरणाचा विचार करून डिझाइन केलेल्या या बॅटरीला IP67-प्रमाणित सुरक्षा आणि लिक्विड-कोल्ड थर्मल मॅनेजमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. याशिवाय यात आय-पॅडलसह रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, वेईकल-टू-लोड (V2L) आणि डिजिटल की यांसारखे स्मार्ट फीचर्स मिळतात.

आधुनिक डिझाइन आणि भविष्यातील तंत्रज्ञान

पुढील भागात कियाचा सिग्नेचर ‘डिजिटल टायगर फेस’, स्टार मॅप एलईडी डीआरएल, एलईडी फॉग लॅम्प्स तर मागील बाजूस स्टार मॅप एलईडी टेल लॅम्प्स दिले आहेत. तसेच १७-इंच क्रिस्टल कट अलॉय व्हील्स आणि ऑटो स्ट्रीमलाइन डोअर हँडल्स गाडीला आधुनिक लूक देते.
केबिनमध्ये सेगमेंटमधील पहिला ७६.२० सेमी (३० इंच) रुंद ट्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये १२.३ इंचाचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट समाविष्ट आहे. संगीतप्रेमींसाठी यात हार्मन कार्डनची प्रीमियम ८-स्पीकर सिस्टीम बसवली आहे.

kia syros EV
किया सिरॉस ईव्ही

सुरक्षेसाठी लेव्हल २ ADAS तंत्रज्ञान

  • प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही गाडी अत्यंत सुरक्षित मानली जात आहे. यात जंक्शन-टर्निंग आणि समोरून येणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसह सेगमेंटमधील सर्वोत्तम १६ ऑटोनामस फीचर्स दिले आहेत.
  • गाडीत ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल-स्टार्ट असिस्ट, ऑल व्हील डिस्क ब्रेक्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक यांसारखे २५ मानक सेफ्टी फीचर्स सर्व मॉडेल्समध्ये मिळतील.

विविध प्रकारच्या ट्रिम्स आणि रंगांचे पर्याय

ही गाडी ग्राहकांसाठी एकूण सात ट्रिम्समध्ये उपलब्ध असेल. रंगांच्या बाबतीत यात ग्लेशियर व्हाईट पर्ल, फ्रॉस्ट ब्लू, ग्रॅव्हिटी ग्रे, मॅग्मा रेड आणि ऑरोरा ब्लॅक पर्लसह नऊ आकर्षक बाह्य रंगांचे पर्याय आहेत. तसेच इंटीरियरसाठी ग्राहकांना क्लाउड ब्लू व ग्रे, आणि ओनिक्स ब्लॅक व हंटर ग्रीन अशा स्टायलिश डिझाइन थीम्स निवडता येतील.