Lava International : स्मार्टफोन बाजारपेठेत चिनी कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी भारताची स्वदेशी मोबाईल उत्पादक कंपनी ‘लावा इंटरनॅशनल’ने मोठा निर्णय घेतला आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी लावा कंपनी आगामी पाच वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स सुटे भाग बनवण्याच्या व्यवसायात १,१०० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे आगामी काळात ८,५०० पेक्षा जास्त नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात स्मार्टफोन उत्पादनात भारताने मोठी झेप घेतली आहे. भारत आता जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे.

भारतातच बनणार डिस्प्ले आणि कॅमेरा मॉड्यूल्स

कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुंतवणुकीचा मोठा हिस्सा स्मार्टफोनसाठी लागणारे अत्यंत महत्त्वाचे आणि महागडे सुटे भाग देशांतर्गत तयार करण्यासाठी वापरला जाणार आहे. यामध्ये डिस्प्ले मॉड्यूल्स, कॅमेरा मॉड्यूल्स, मल्टिलेअर प्रिंटेड सर्किट बोर्ड्स आणि मोबाईलचे कव्हर्स आणि एन्क्लोजर्सचा या घटकांचा समावेश आहे. लावा इंटरनॅशनलचे ईडी आणि सीईओ संजीव अग्रवाल यांनी सांगितले की, “स्मार्टफोनमधील दर्जा वाढवण्यासाठी आम्ही हे महत्त्वपूर्ण सुटे भाग स्वतःच बनवण्याचा निर्णय घेतला आहे.” सध्या लावा कंपनीकडे वार्षिक ४ कोटी मोबाईल फोन्स बनवण्याची क्षमता आहे.

डिजाइनिंगमध्ये भारत अव्वल

लावा ही २०१५ मध्ये भारतात मोबाईल उत्पादन सुरू करणारी आणि देशात स्वतःचे ‘डिझाईन सेंटर’ उभारणारी पहिली कंपनी होती. आज लावाचे सर्व फोन भारतातच डिझाईन केले जातात. नोएडा येथील प्लांटमध्ये सध्या ३,००० हून अधिक कामगार आहेत. भारतात लावा डिझाईन करत असलेले चार्जर स्थानिक सुट्या भागांपासून बनवले जात असून, ते पूर्वीच्या तुलनेत सुमारे २० टक्के स्वस्त आणि अधिक दर्जेदार आहेत.

सरकारी योजनांचा पाठबळ

लावा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक सुनील रैना यांनी सांगितले की, कंपनीने केंद्र सरकारच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स कम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम’ अंतर्गत आपला प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे. याशिवाय, उत्तर प्रदेश सरकारच्या उत्पादन प्रोत्साहन योजनांचा लाभ घेण्याचीही कंपनीची योजना आहे. या स्थानिक उत्पादनामुळे कच्च्या मालाची आयातीवरील निर्भरता कमी होणार आहे.

‘लावा’चे पुनरागमन

वर्ष २०१७-१८ दरम्यान चिनी स्मार्टफोन कंपन्यांनी स्वस्तात दर्जेदार उत्पादने सादर केल्याने भारतीय ब्रँड्सना बाजारातून बाहेर पडावे लागले होते. सुमारे १२-१३ वर्षांपूर्वी भारतीय कंपन्यांचा बाजारातील वाटा ५०% होता, जो आता फिचर फोनसह घसरून केवळ ६ ते ७ टक्क्यांवर आला आहे. लावा कंपनीही याला अपवाद नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत एका नवीन रणनीतीसह कंपनीने भारतीय बाजारपेठेत दमदार पुनरागमन केले आहे.