Mahindra Thar OG price features : भारतात ऑफरोडिंग म्हटलं की महिंद्रा थारशिवाय दुसरी कोणतीही गाडी डोळ्यांसमोर येत नाही. अल्पावधीत महिंद्रा थार तरुणांची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही बनली आहे. हीच महिंद्रा थार आता नव्या आणि दमदार अवतारात दाखल झाली आहे. कंपनीने आपली नवीन ‘महिंद्रा थार ओजी’ (Thar OG) १०.३२ लाख रुपये (एक्स-शोरूम) या किंमतीत लाँच केली आहे. विशेष म्हणजे, यावेळी फक्त डिझाइन बदललं नसून, कंपनीने यात अनेक तांत्रिक बदल, नवीन प्लॅटफॉर्म आणि दमदार फीचर्स दिले आहेत. मोठ्या ‘थार रॉक’पेक्षा या गाडीची वेगळी ओळख राहावी, यासाठी कंपनीने या ३-डोर मॉडेलला ‘थार ओजी’ हे नवीन नाव दिलं आहे.

किंमत आणि व्हेरियंट्सची माहिती

नवीन महिंद्रा थार ओजीची सुरुवातीची किंमत जुन्या थार एवढीच ठेवण्यात आली आहे, म्हणजेच ती १०.३२ लाख रुपयांपासून सुरू होते. महिंद्राने यात ३ प्रमुख व्हेरियंट्समध्ये दिले आहेत. AXT (१०.३२ लाख), LXT (१२.९९ लाख एक्स शो रूम) आणि ZXT (१३.९९ लाख सुरुवातीची किंमत). टॉप व्हेरियंट १७ लाख ७५ हजार रुपयांपर्यंत येते. यात एन्ट्री-लेवल १.५-लीटर डिझेल इंजिन सर्व, म्हणजेच तिन्ही व्हेरियंट्समध्ये मिळणार आहे. तर मोठ्या इंजिनचे पर्याय LXT व्हेरियंटपासून पुढे मिळतात. ही गाडी ग्राहकांच्या गरजेनुसार रिअर-व्हील ड्राइव्ह आणि फोर-व्हील ड्राइव्ह या दोन्ही प्रणालींमध्ये उपलब्ध आहे.

महिंद्रा थार ओजीमध्ये वेगळं काय?

  • या गाडीमध्ये महिंद्राचा नवीन M_Glyde 4G प्लॅटफॉर्म वापरण्यात आला आहे, ज्यामुळे गाडीच्या चॅसीची मजबूती वाढली आहे. तसेच यात वॉट्स लिंकसह नवीन रियर पेंटालिंक सेटअप देण्यात आला आहे. रायडर्सना उत्तम आराम मिळावा यासाठी ‘DAVINCI डॅम्पर्स’ (फ्रिक्वेन्सी-डिपेंडंट डॅम्पिंग) दिले आहेत.
  • जुने हाइड्रोलिक स्टीयरिंगच्या जागी कंपनीने इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंग दिले आहे. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये किंवा पार्किंग करताना गाडी वळवणे आता खूप सोपे होणार आहे.
  • २.० लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन १६२ hp पॉवर आणि ३३० Nm टॉर्क जनरेट करते, तर २.२-लीटर डिझेल इंजिन आता १५२ hp पॉवर आणि ३३० Nm टॉर्क देते (जुने मॉडेल १३२ hp पॉवर देत होते). १..५ लीटर डिझेल इंजिनमध्ये कोणताही बदल झालेला नाही, हे आधीप्रमाणेच ११७ hp पॉवर आणि ३०० Nm टॉर्क देते. यात ६-स्पीड मॅन्युअल आणि मोठ्या इंजिनसोबत ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो.

आकर्षक लूक आणि स्टायलिश डिझाइन

बाहेरून पाहताना गाडीत बरेच आधुनिक बदल दिसून येतात. थार ओजी मध्ये Thar ब्रँडिंग असलेली नवीन ग्रिल, सी-शेप DRLs सह नवीन LED हेडलॅम्प्स, कॉर्नरिंग फंक्शन असलेले LED फॉग लॅम्प्स आणि नवीन बंपर दिले आहेत. तसेच यात १९ इंचाचे अलॉय व्हील्स मिळतात. कंपनीने यात ‘आर्टेमिस सिल्व्हर’ आणि ‘जीन्स ब्लू’ हे दोन नवीन आकर्षक कलर ऑप्शन्स दिले आहेत.

सुरक्षिततेबाबत तडजोड नाही

थार ओजीच्या सर्वच व्हेरियंट्समध्ये ६ एअरबॅग्ज आणि चारही चाकांमध्ये डिस्क ब्रेक स्टँडर्ड देण्यात आले आहेत. याशिवाय ईएसपीसह रोलओव्हर मिटिगेशन, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल-होल्ड कंट्रोल आणि व्हीकल डायनॅमिक्स कंट्रोलसारखे आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने या नवीन मॉडेलमधील नॉइज, व्हायब्रेशन आणि हर्षनेस लेव्हल देखील बऱ्यापैकी कमी केली आहे.