Mark Zuckerberg Meta Ray Ban failure: टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग एका कार्यक्रमात कंपनीचे नवीन उत्पादन सादर करणार असतात. या इव्हेंटला हजारो लोकांची प्रत्यक्ष उपस्थिती, तर कोट्यवधी लोक लाईव्ह आहेत. अशावेळी नवीन उत्पादनाच्या ५ पैकी २ गोष्टी ठरल्याप्रमाणे कामच करत नाही. साऱ्या जगासमोर आपलं उत्पादन अपयशी ठरलं, आपली नाचक्की झाली, असा विचार येऊन सीईओने किती जणांना फैलावर घेतलं असतं? मात्र, या अपयशानंतर मार्कने जे केलं ते पाहून आपण अचंबित झालो, असे उद्गार प्रसिद्ध भारतीय उद्योजक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर वरूण मय्या यांनी काढले. यावेळी भारतीय मानसिकता आणि परदेशी दृष्टीकोन याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

लाईव्ह इव्हेंट कुठे फसला?

काही दिवसांपूर्वी मेटाने त्यांच्या एआय-सुसज्ज रे-बॅन (Ray-Ban) स्मार्ट चष्म्यांचे लाइव्ह सादरीकरण केले होते. विशेष म्हणजे, या लाइव्ह डेमो दरम्यान काही फीचर्स व्यवस्थित काम करू शकले नाही आणि त्यात काही तांत्रिक अडथळे आले होते. जगातील सर्वात मूल्यवान कंपन्यांपैकी एका कंपनीच्या प्रमुखासाठी हा प्रसंग अत्यंत लाजिरवाणा ठरला असता. मात्र, झुकरबर्ग यांनी यावर जी प्रतिक्रिया दिली, ती थक्क करणारी होती.

काय म्हणाले मार्क झुकरबर्ग?

इव्हेंट संपल्यानंतर वरून मय्या यांनी मार्क झुकरबर्ग यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी एवढी मोठी जोखीम घेत थेट लाइव्ह डेमो घेतल्याबद्दल झुकरबर्ग यांचे कौतुक केले. यावर झुकरबर्ग यांनी दिलेले उत्तर मय्यांसाठी अनपेक्षित होते. मार्क झुकरबर्ग मय्या यांना म्हणाले, “मला आनंद आहे की आपण पाचपैकी तीन गोष्टी बरोबर करून दाखवल्या!”

एका ट्रिलियन डॉलर कंपनीच्या मालकाने अपयशावर केलेली ही साधी आणि सकारात्मक टिप्पणी मय्या यांना खूप काही शिकवून गेली. जे फीचर्स बिघडले, त्यावर दुःख व्यक्त करत बसण्याऐवजी, जे यशस्वी झाले आणि जे धाडस दाखवले गेले, त्यावर झुकरबर्ग यांनी लक्ष केंद्रित केले होते.

भारतीय संस्कृती आणि अपयशाची भीती

हा किस्सा सांगताना वरूण मय्या यांनी भारतात नवीन उद्योजक तयार का होत नाही? यामागचं कारण सांगितले. त्यांच्या मते, भारतात आजही अपयशाची प्रचंड भीती बाळगली जाते. लोक समाजात हसे होईल किंवा टीका होईल या भीतीने जोखीम पत्करायला घाबरतात. याच भीतीपोटी अनेकदा गुणी तरुण मोठे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्याचे धाडसच करत नाहीत.

सिलिकॉन व्हॅलीचे यश कशात आहे?

मय्या म्हणाले, सिलिकॉन व्हॅलीसारख्या ग्लोबल इनोव्हेशन हबमध्ये अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. तिथे उद्योजक सार्वजनिकरीत्या नवीन कल्पनांवर प्रयोग करतात. अपयश हे यशस्वी उत्पादने आणि व्यवसाय उभारण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग असल्याचे समजले जाते.

प्रवासात ‘नशिबाची’ साथही महत्त्वाची असते, हे मान्य करत मय्या यांनी एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, “जर तुम्ही प्रयत्नच केले नाहीत, तर नशीबही तुम्हाला शोधत येऊ शकत नाही.”