Meta AI Safety Team Fired : आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयच्या स्पर्धेत पुढे राहण्यासाठी दिग्गज कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींसाठी अब्जावधी रुपये खर्च केले जात आहे. मात्र, त्याचवेळी तडकाफडकी अनेकांचे रोजगारही हिसकावून घेतले जात आहे. अशा काळात फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटा’ला मोठा धक्का बसला आहे. एआय सुरक्षा आणि सुरक्षितता यंत्रणा मजबूत करण्यासाठी कंपनीने ४ महिन्यांपूर्वी एका स्टार्टअप कंपनीतील तज्ज्ञांना टीममध्ये घेतलं होतं. मात्र, या सर्वांना आता घरी पाठवलं आहे. विशेष म्हणजे यात स्टार्टअप कंपनीच्या सह-संस्थापकाचाही समावेश आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
जून महिन्यात मेटाने एआय सुरक्षा आणि गव्हर्नन्स टूल्स विकसित करणाऱ्या ‘व्हर्च्यू एआय’चे सह-संस्थापक आणि टीमला आपल्याकडे ओढले होते. ही भरती मेटासाठी एक मोठे यश मानली जात होती. मात्र, आता हा प्रयोग पूर्णपणे फसल्याचे समोर आले आहे. मेटाचे प्रवक्ते अँडी स्टोन यांनी ‘सेमाफोर’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, हा कराराला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. दोन्ही बाजूंच्या कामाच्या पद्धतींमध्ये मोठा फरक असल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. मेटाच्या ‘सुपरइंटेलिजन्स लॅब्स’ची एआय सुरक्षा आणि फ्रंटियर-रिस्क रिसर्चप्रती असलेली जबाबदारी कायम आहे, असा दावाही कंपनीने केला आहे.
कोण बाहेर पडले?
या कर्मचारी कपातीमध्ये ‘व्हर्च्यू एआय’चे सह-संस्थापक बो ली (Bo Li), डॉन सॉन्ग आणि सॅनमी कोयेजो यांचा समावेश आहे. या स्टार्टअपच्या तंत्रज्ञानाने यापूर्वी ओपनएआय, अँथ्रोपिक आणि यूएस कॉमर्स डिपार्टमेंटच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी सोबतही काम केले होते.
एआय धोरण अजून विकसित होतंय
जगभरात सध्या एआयच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एआयमुळे भविष्यात मानवाला धोका असून त्यावर नियंत्रण असावर यावर चर्चा सुरू आहे. यामुळेच टेक जगातील कंपन्या आता यावर खर्च करताना पाहायला मिळत आहे. मात्र, मेटाच्या या निर्णयामुळे टेक जगतात खळबळ उडाली आहे. ‘एक्स’वरील युजर्सनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटले, “ओपनएआयने कालच त्यांच्या एआय सेफ्टी रिसर्च टीममधील सदस्यांना कामावरून काढले, आणि आता मेटानेही तेच केले! अवघ्या ४ महिन्यांत कंत्राट मोडले गेले. नेमके चालले काय आहे?”
तर दुसऱ्या एका युजरने संशय व्यक्त केला की, टेक कंपन्या आता बाहेरील सुरक्षा तपासण्या आणि कडक नियमांपासून दूर पळतायेत का? एकापाठोपाठ एका कंपनीकडून सुरक्षा तज्ज्ञांची अशी कपात होणे भविष्यातील धोक्यांची चाहूल देणारे असल्याची चर्चा आर्थिक व तंत्रज्ञान वर्तुळात रंगली आहे.
