Meta Layoffs: कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) भर वाढवत व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्म्सची पालक कंपनी मेटाने एका मोठ्या पुनर्रचना योजनेची आखणी केली आहे. मेटाच्या या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी गमवावी लागणार असून, याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती देण्यास कंपनीने सुरुवात केली आहे.

मेटाच्या अंतर्गत मेमोंनुसार, ते सुमारे ८,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ते सुमारे ७,००० कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्रित नवीन पदांमध्ये वर्ग करणार आहेत.

दरम्यान, कर्मचाऱ्यांची कपात प्रक्रिया सुरू झाल्यावर त्यांना नेमक्या कशाची अपेक्षा करावी लागेल, याविषयी ‘मेटा’च्या एचआर प्रमुख जनेल गेल यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार, विविध देशांमधील स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास, एकूण तीन टप्प्यांमध्ये या नोटीस पाठवल्या जाणार आहेत.

माझे मन सांगतेय की, माझी नोकरी जाणार आहे

या नोकरकपातीमुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. डेटा इंजिनिअरिंगमध्ये काम करणाऱ्या मेटाच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, अधिकृत माहिती येण्यापूर्वीच, कंपनीच्या नोकरकपातीचा भाग म्हणून आपली नोकरी जाण्याची शक्यता आहे. ‘ब्लाइंड’वर अनामिकपणे पोस्ट करताना, त्या कर्मचाऱ्याने सांगितले की नोकरकपात आणि व्हिसाच्या अनिश्चिततेमुळे तो खूप चिंताग्रस्त आहे.

एका वर्षापूर्वी H1B व्हिसावर मेटा कंपनीत रुजू झालेल्या या कर्मचाऱ्याने सांगितले की, त्याने बाहेरील डेटा इंजिनिअरिंग पदांसाठी अर्ज करण्यास आधीच सुरुवात केली आहे. पण, नकाराचे ईमेल, कॉल-बॅकचा अभाव आणि अपेक्षेपेक्षा कमी जागा उपलब्ध असणे, या कारणांमुळे त्याने सध्याच्या बाजारपेठेचे वर्णन “अत्यंत खडतर” असे केले.

‘ब्लाइंड’वरील पोस्टमध्ये, त्या कर्मचाऱ्याने नोकरकपात झाल्यास अमेरिकेतील आपला कायदेशीर दर्जा कसा टिकवून ठेवावा, यासाठी सहकारी टेक कर्मचाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यांनी विशेषतः H1B व्हिसासाठी मिळणारा ६० दिवसांचा सवलतीचा कालावधी, F1 व्हिसावर जाण्यापलीकडील पर्यायी व्हिसाचे पर्याय आणि H1B व्हिसा हस्तांतरित करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांबद्दल स्पष्टता मागितली आहे.

व्हिसाच्या चिंतेपलीकडे, त्या कर्मचाऱ्याने कबूल केले की त्याला दीर्घकालीन करिअरमधील प्रगती आणि मोबदल्याबद्दलही काळजी वाटत आहे. “गरज पडल्यास मिळेल ती कोणतीही नोकरी स्वीकारायला मी पूर्णपणे तयार आहे, पण घाबरून मला टाळता येण्याजोग्या चुका करायच्या नाहीत”, असे त्या पोस्टमध्ये लिहिले होते.

मेटा कर्मचारी कपातीतील ताज्या घडामोडी: २० मे

  • मोठ्या कर्मचारी कपातीबरोबर मेटा ७,००० कर्मचाऱ्यांना नवीन एआय-केंद्रित टीममध्ये वर्ग करत आहे.
  • ही पुनर्रचना संपूर्ण कंपनीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेकडे (AI) होणाऱ्या मोठ्या बदलाचा एक भाग आहे.
  • मेटा या आठवड्यात सुमारे ८,००० कर्मचाऱ्यांना, म्हणजेच आपल्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे १०% कर्मचाऱ्यांना, कामावरून कमी करणार आहे.
  • कंपनी ६,००० रिक्त पदांची भरती देखील बंद करणार आहे.
  • बदल सुरू होत असताना, उत्तर अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना अंमलबजावणीच्या दिवशी घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे.
  • एचआर प्रमुख जेनेल गेल यांनी बदलांचे स्पष्टीकरण देणारे एक अंतर्गत मेमो शेअर केला आहे.
  • नवीन टीममध्ये व्यवस्थापकांची संख्या कमी असेल आणि ते “एआय नेटिव्ह” डिझाइनवर लक्ष केंद्रित करतील.
  • गुगल आणि ओपनएआय सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी मेटा एआय पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे.
  • अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना १६ आठवड्यांचा सेवा समाप्ती मोबदला (सेव्हरन्स पे) आणि कार्यकाळानुसार अतिरिक्त रक्कम मिळेल.
  • कर्मचाऱ्यांनी गोपनीयतेच्या समस्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, ज्यात एआय प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या माऊस-ट्रॅकिंग साधनांचा समावेश आहे.
  • मेटा एकाच वेळी एआयवरील खर्चही वाढवत असून, २०२६ मध्ये १२५-१४५ अब्ज डॉलर्सचा भांडवली खर्च करण्याचे नियोजन आहे. नेतृत्वाचे म्हणणे आहे की, एआयच्या विकासामुळे भविष्यात कंपनीच्या “आदर्श मनुष्यबळाची संख्या” निश्चित करणे कठीण होत आहे.