Meta Layoffs Leaked Mail: इन्स्टाग्राम, फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची पालक कंपनी असलेल्या मेटाने ८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. कंपनीने २० मे २०२६ पासून कपात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना ईमेलच्या माध्यमातून याची माहिती देण्यास सुरुवात केली आहे.
मेटाने या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे, “दुर्दैवाने पुनर्रचनेचा (Reorganisation) एक भाग म्हणून तुमचे पद रद्द करण्यात आले आहे. जर तुम्ही सध्या कार्यालयात उपस्थित असाल, तर कृपया तुमच्या डेस्कवरील सर्व वैयक्तिक वस्तू गोळा करून घरी जावे, अशी आम्ही विनंती करतो.” हा मेल बिझनेस इनसाइडरने पाहिला असून त्यानंतर त्यांनी याबाबत वृत्त दिले आहे.
ही नोकरकपात “कंपनी अधिक कार्यक्षमतेने चालवण्याच्या आमच्या सततच्या प्रयत्नांचा” भाग असल्याचे मेटाने म्हटले आहे आणि सांगितले की या कपातीमुळे कंपनीला “इतर (एआय) गुंतवणुकींची भरपाई करण्यास” मदत होईल.
ईमेलमध्ये मेटाने पुढे म्हटले, “आम्ही यापूर्वी कळवल्याप्रमाणे कंपनीचे काम अधिक कार्यक्षमतेने चालवण्यासाठी आणि आम्ही करत असलेल्या इतर गुंतवणुकीचा समतोल राखण्यासाठी कर्मचारी संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्दैवाने, आजच्या पुनर्रचनेचा एक भाग म्हणून तुमचे पद संपुष्टात आणण्यात आले आहे. याविषयी अधिक तपशील देण्यापूर्वी मेटासाठी तुम्ही दिलेल्या सर्व योगदानाबद्दल आम्ही तुमचे आभार मानू इच्छितो. कंपनीच्या या वाटचालीत तुम्ही बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे आम्ही मनापासून कौतुक करतो.”
७ हजार कर्मचारी AI टीम्समध्ये
एका अंतर्गत परिपत्रकात मेटाचे ‘मुख्य मनुष्यबळ अधिकारी’ (Chief People Officer) जनेल गेल यांनी स्पष्ट केले आहे की, कंपनी केवळ कर्मचाऱ्यांची कपातच करत नाहीये. तर सुमारे ७,००० कर्मचाऱ्यांची नवीन ‘AI’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) टीम्समध्ये बदली देखील केली जाईल. या टीम्सचे मुख्य उद्दिष्ट असे ‘AI एजंट्स’ विकसित करणे हे असेल जे भविष्यात सध्या मानवाद्वारे केल्या जाणाऱ्या विविध कामांची जबाबदारी सांभाळण्यास सक्षम असतील. कंपनी आता आकाराने लहान, परंतु अधिक वेगवान आणि तंत्रज्ञान-आधारित टीम्स उभारण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
इतर कंपन्यांमध्येही नोकरकरता
गेल्या काही महिन्यांत अनेक मोठ्या तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. अलीकडेच, ‘सिस्को’ने सुमारे ४,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या योजनेचा खुलासा केला. याव्यतिरिक्त, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘ॲमेझॉन’ आणि इतर कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, तंत्रज्ञान उद्योग सध्या एका महत्त्वपूर्ण स्थित्यंतराच्या टप्प्यातून जात आहे.
