Meta LinkedIn layoffs And IT Employees Mental Health Crisis: फार पूर्वीची गोष्टी नाही, जेव्हा लोकांना मेटा किंवा लिंक्डइनसारख्या कंपन्यांमध्ये काम करतोय असे सांगताना एक वेगळाच अभिमान वाटायचा. गलेलठ्ठ पगार, अमर्याद सुविधा आणि ‘आपण आयुष्यात सेट झालोय’ ही भावना असायची. यामुळे या नोकऱ्यांकडे आधुनिक जगातील ‘ड्रीम जॉब्स’ म्हणून पाहिले जायचे.

पण आज परिस्थिती इतकी बदलली आहे की, त्याच कर्मचाऱ्यांच्या मनात आता कायम एकच भीती असते, ती म्हणजे आपली नोकरी सुरक्षित आहे का? इन्स्टाग्राम, व्हाट्सअॅप आणि फेसबुकची पालक कंपनी असलेल्या मेटाने आज (२०, मे २०२६) तब्बल ८००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. तर लिंक्डइननेही ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. आता हा विषय फक्त नोकरी जाण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. तर नोकरीच्या या सततच्या अनिश्चिततेमुळे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील तरुण पिढी मानसिकदृष्ट्या खचून चालली आहे.

मी अंघोळ करताना हमसून हमसून रडतो

नोकरी जाण्याच्या भीतीबाबत बोलताना मेटाच्या एका जुन्या कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली की, “गेल्या अनेक आठवड्यांपासून कामावर जाण्यापूर्वी मी रोज सकाळी माझे ईमेल तपासातोय.” याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

“मी अंघोळ करताना हमसून हमसून रडतो, पण कामाच्या ठिकाणी मात्र मी चेहऱ्यावर धैर्याचा मुखवटा चढवतो”, असे या कर्मचाऱ्याने पुढे सांगितले.

गेल्या काही महिन्यांमध्ये जगभरातील अनेक आघाडीच्या आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली आहे. यामुळे सध्या आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या आयटी कर्मचाऱ्यांमध्ये नोकरीच्या सुरक्षिततेबाबत चिंता आहे. यामुळे अनेक कर्मचारी घर खरेदी, अपत्यप्राप्ती, कर्ज घेणे किंवा सुट्ट्यांचे नियोजन करणे यासारखे आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेणे टाळत आहेत.

कार्यपद्धतीमध्ये एआय चे महत्त्व वाढले

मेटा कंपनीशी संलग्न असलेले आणि महाराष्ट्रात कार्यरत असलेले स्वतंत्र सायबर सिक्युरिटी संशोधक शुभम भामरे यांनी एनडीटीव्हीला सांगितले, “मेटा आपले संपूर्ण लक्ष ‘AI’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) कडे वळवत आहे. अगदी त्यांचा महत्त्वाकांक्षी ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ प्रकल्प असलेला ‘मेटाव्हर्स’सुद्धा सध्या दुय्यम स्थानी गेल्याचे दिसून येत आहे. अलीकडच्या काळात, कंपनीच्या सायबर सुरक्षा टीमला प्रतिसाद देण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागत आहे. शिवाय, त्यांनी आता एक ‘स्वयंचलित प्रतिसाद प्रणाली’ (automated reply system) देखील कार्यान्वित केली आहे. त्यामुळे, हे आणखी एक असे क्षेत्र आहे जिथे ‘AI’ मानवी कर्मचाऱ्यांची जागा घेत आहे.”

लिंक्डइन

दुसरीकडे, ज्या प्लॅटफॉर्मचा वापर लोक नोकरी शोधण्यासाठी करतात त्या लिंक्डइनमधील कर्मचारीही अनिश्चिततेचा सामना करत आहेत. न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, लिक्डइन कॅलिफोर्नियामधील ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसांत कामावरुन काढणार आहे. ही कपात लिंक्डइनच्या जागतिक कर्मचारी संख्येच्या जवळपास ५ टक्क्यांपर्यंत असू शकते. दोन अंकी महसूल वाढ असूनही लिंक्डइन कर्मचारी कपात करत आहे.