मुंबई : भारतीय बाजारात नवनवीन स्मार्टफोन आणून स्वत:चा वेगळा ग्राहकवर्ग निर्माण करू पाहणाऱ्या मोटोरोलाने शुक्रवारी उच्च किंमत श्रेणीतील ‘प्रीमियम’ बाजारपेठेत प्रवेशाची घोषणा केली. ‘सिग्नेचर’ श्रेणीतील ५५ ते ७० हजार रुपयांच्या किमतीतील पहिला स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच मुंबईतील एका कार्यक्रमात मोटोरोलाकडून सादर करण्यात आला.
सोनी कंपनीचे कॅमेरा तंत्रज्ञान, बोसचे ध्वनी तंत्रज्ञान, स्नॅपड्रॅगनचा अल्ट्रा थिन प्रोसेसर, स्मार्टफोनमधील उष्णता नियंत्रित ठेवणारे लिक्विड मेटल तंत्रज्ञान, डॉल्बी व्हिजन व्हिडिओ रेकॉर्डिंग सुविधा, ५२०० एमएएच क्षमतेची बॅटरी अशी दमदार वैशिष्ट्ये मोटोरोला सिग्नेचरमध्ये अंतर्भूत करण्यात आली आहेत.
संपूर्णपणे ॲल्युमिनियममध्ये घडवण्यात आलेला स्मार्टफोनचा सांगाडा आणि त्याला ‘फॅब्रिक’सम स्पर्शानुभव देणारी बॉडी यामुळे हा फोन ‘प्रीमियम’ श्रेणीत लक्षवेधक ठरेल, असा विश्वास मोटोरोलाचे उपाध्यक्ष (डिझाइन, ब्रॅण्ड, सीएक्स) रुबीन कॅस्टानो यांनी व्यक्त केला. कॅस्टानो यांच्यासह ‘मोटोरोला’च्या स्मार्टफोनची भारतातील सदिच्छा दूत क्रिती सोनन ही या सादरीकरण सोहळ्याला उपस्थित होती.
या फोनबरोबर कंपनीने विमानप्रवास, हॉटेल, लाँजसेवा अशा काही अभिनव सुविधाही ग्राहकांना देऊ केल्या आहेत. हा स्मार्टफोन १२ जीबी रॅम- २५६ जीबी साठवण क्षमता, १६ जीबी रॅम – ५१२ जीबी साठवण क्षमता आणि १६ जीबी रॅम एक टीबी साठवण क्षमता अशा तीन श्रेणींत उपलब्ध असून त्याची किंमत ५५ हजार रुपयांपासून ७० हजार रुपयांपर्यंत आहे. येत्या ३० जानेवारीपासून फोन सर्वत्र विक्रीस उपलब्ध होणार आहे.
