Reliance Satellite Communication: रिलायन्स इंडस्ट्रीज सॅटेलाइट (उपग्रह) कम्युनिकेशन क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची संभाव्य गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. यामुळे मुकेश अंबानींच्या या समूहाची स्पर्धा एलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्टारलिंक, ॲमेझॉन लिओ आणि इतरांशी होईल. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सूत्रांनी अशी माहिती दिल्याचे वृत्त इकोनॉमिक टाईम्सने दिले आहे.

“रिलायन्स इंडस्ट्रीज प्रचंड क्षमता असलेल्या सॅटेलाइट क्षेत्रात आणि विशेषतः ‘लो अर्थ ऑर्बिट’ (LEO) विभागात प्रमुख दावेदार बनू इच्छिते”, असे या प्रकरणाची सविस्तर माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितले. उपग्रह व्यवसायाचा हा विभाग ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’ (JPL) अंतर्गत कार्यरत असेल. जिओ प्लॅटफॉर्म्स रिलायन्स इंडस्ट्रीजचे दूरसंचार आणि डिजिटल व्यवसाय सांभाळते.

सॅटेलाइट, प्रक्षेपण, पेलोड्स आणि युजर टर्मिनल्स यांसारख्या प्रकल्पाच्या विविध पैलूंवर काम करण्यासाठी सहा पथके स्थापन करण्यात आल्याचे, वरील सूत्रांनी सांगितले.

ही योजना सॅटेलाइट कम्युनिकेशन (Satcom) क्षेत्रात विशेषतः ‘LEO’ (पृथ्वीच्या कक्षेतील खालचा टप्पा) विभागात भारताचा सक्रिय सहभाग असावा, या सरकारच्या महत्त्वाकांक्षेशी सुसंगत आहे. कारण विविध संघर्षांमध्ये या क्षेत्राची भूमिका अत्यंत निर्णायक ठरत असल्याने, विदेशी संस्थांवरील अवलंबित्व हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठरू शकते.

या प्रकल्पाचे नेतृत्व मुकेश अंबानींकडे

चीनने ‘आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ’ (ITU) कडे, अनेक ‘लो अर्थ ऑर्बिट’ सॅटेलाइट समूहांमध्ये (constellations) एकूण २,००,००० सॅटेलाइट प्रस्थापित करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. आपले हितसंबंध सुरक्षित करण्याच्या उद्देशाने, इतरही अनेक देश अंतराळ क्षेत्रात विशेषतः LEO क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. “गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. या सॅटेलाइट समूहांची उभारणी करण्यास मदत करू शकणाऱ्या विविध सॅटेलाइट तंत्रज्ञान कंपन्यांसोबत सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत”, असे एका दुसऱ्या व्यक्तीने सांगितले.

आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाकडे ‘ऑर्बिटल स्लॉट्स’ (कक्षांमधील जागा) नोंदवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, रिलायन्सने दूरसंचार विभागाशी (DoT) चर्चा करण्यासही सुरुवात केली आहे. ही संस्था सॅटेलाइट्ससाठी ऑर्बिटल स्लॉट्स आणि रेडिओ फ्रिक्वेन्सींचे वाटप करते. या प्रकल्पाचे नेतृत्व मुकेश अंबानी करत असले, तरी इतर वरिष्ठ अधिकारीही यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे, वरील सूत्रांनी सांगितले.

यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष पी.के. भाटनागर, जिओ प्लॅटफॉर्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू उम्मेन आणि जिओ प्लॅटफॉर्म्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आयुष भाटनागर यांचा समावेश आहे.

भारताला काय फायदा?

भारताला स्वतःचा सॅटेलाइट (उपग्रह) समूह मिळाल्यास देशाला डिजिटल सार्वभौमत्व, सुरक्षा आणि डेटा गोपनीयता प्राप्त होईल. तसेच, यामुळे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यास आणि पाळत ठेवण्याशी संबंधित गरजांची पूर्तता करण्यासही मदत होईल.