Mumbai IT engineer laid off on birthday : सध्या तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कंपन्या किती अमानवीय पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत असल्याचे वारंवार समोर येत आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची घरात तयारी सुरू असतानाच एका आयटी इंजिनिअरला नोकरीवरुन काढल्याचा मेल आला. मुंबईतील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत घडलेल्या या घटनेने सध्या टेक जगतात आणि सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, तंत्रज्ञान कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता भारतातील संपूर्ण टीमला एका झटक्यात नोकरीवरुन काढून टाकले.

नेमकी घटना काय आहे?

रेडिट (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फुल-स्टॅक डेव्हलपर असलेल्या तरुणाने आपली आपबीती शेअर केली आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला कंपनीने कामावरून काढून टाकल्याची बातमी दिली. आश्चर्यकारक बाब म्हणजे, हा तरुण कंपनीतील अनेक महत्त्वाच्या प्रोजेक्ट्समध्ये मुख्य भूमिकेत काम करत होता. अनेक तंत्रज्ञानांची जबाबदारी त्याच्यावरच होती. त्याला या क्षेत्रात ५ वर्षे काम करण्याचा अनुभव आहे.

या इंजिनियरकडे React, Node.js, React Native, AWS आणि SQL सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य आहे. नुकताच तो पाइनकोन आणि लाइव्हजेन तंत्रज्ञानाचा वापर करून एका ‘एआय अवतार’ प्रोजेक्टवर काम करत होता, असे त्याने सांगितले. कंपनीने एकाच झटक्यात त्याच्यासह एकूण ८ कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

पर्सनल प्रोजेक्टमधून कमाईचा आधार

वाढदिवशी नोकरी गेल्याचा मोठा धक्का बसला असला, तरी कौशल्याच्या जोरावर या तरुणाने परिस्थितीचा सामना करण्याचे ठरवले आहे. सध्या तो मुलाखतींची तयारी करत असून, त्याने स्वतःचा एक पर्सनल प्रोजेक्टही सुरू ठेवला आहे, ज्यातून गेल्या दोन महिन्यांत त्याची सुमारे ४०० डॉलर्सची (अंदाजे ३४ हजार रुपये) कमाई झाली आहे.

टेक कम्युनिटीकडून पाठिंबा

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर टेक कम्युनिटीने या तरुणाला सोशल मीडियावर मोठा पाठिंबा दिला. अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत धीर दिला, तर एका युजरने चक्क ॲमेझॉन कंपनीत रेफरन्स देण्याची ऑफर दिली. या घटनेनंतर आणखी एका इंजिनियरने आपला असाच अनुभव शेअर केला. ओरॅकल कंपनीत नोकरी करणाऱ्या या कर्मचाऱ्यालाही वाढदिवसाच्या दिवशीच नोकरी गेल्याचा मेल आला होता. “कौशल्य किंवा कामगिरीचा आणि लेऑफशी संबंध नसतो, तर अनेकदा व्यवस्थापनाच्या चुकीच्या व्यावसायिक निर्णयांची किंमत कर्मचाऱ्यांना चुकवावी लागते,” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

गेल्या वर्षभरात दीड लाखांहून अधिक रोजगार गेले

गेल्या वर्षभरात जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीची लाट पाहायला मिळत आहे. वर्षभरात दीड लाखांहून अधिक तरुणांनी यात रोजगार गमावला आहे. भारतासारख्या देशालाही याचा मोठा फटका बसला आहे. सध्या वाढत्या ऑटोमेशन आणि एआय टूल्सच्या वापरामुळे टेक क्षेत्रातील नोकऱ्यांच्या पद्धतीत मोठे बदल होत आहेत.