Nandan Nilekani AI Job Loss : आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विविध क्षेत्रातील शिरकाव रोजगारावर मोठा परिणाम करत आहे. एकेकाळी सर्वाधिक पगार आणि सोयी-सुविधा देणाऱ्या आयटी क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात नोकरकपात होत आहे. मात्र, भविष्यात हे चित्र बदलणार असून देशातील लाखो छोटे व्यवसाय हेच रोजगार निर्मितीचे प्रमुख केंद्र बनतील, असा दावा ‘इन्फोसिस’चे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांनी केला आहे. कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक रोजगारनिर्मिती होईल, यावरही निलेकणी यांनी भाष्य केलं आहे. ‘नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च’द्वारे गुरुवारी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

मोठ्या कंपन्यांमधील नोकऱ्या का जाणार?

निलेकणी म्हणाले, की मोठ्या कंपन्यांची रचना अत्यंत शिस्तबद्ध असते. या कंपन्यांमध्ये प्रत्येक काम विभागून दिलेले असते. परिणामी भविष्यात अशी ‘रुटीन’ कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जागा एआय घेईल. एआय सध्या खूप महागडे तंत्रज्ञान आहे. त्यामुळे छोट्या किंवा कमी भांडवल असणाऱ्या कंपन्या ते लगेच स्वीकारू शकणार नाहीत. छोट्या व्यवसायांमध्ये एकाच कर्मचाऱ्याला अनेक प्रकारची कामे करावी लागतात, ज्यामुळे तिथे एआयमुळे नोकऱ्या जाण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे भविष्यात रोजगार निर्मितीचे खरे इंजिन छोटे व्यवसायच असतील, असे निलेकणी म्हणाले. याउलट, मोठ्या कंपन्या एआयमध्ये करत असलेली गुंतवणूक पाहता, तिथे रोजगार जास्त प्रमाणात कमी होईल.

छोट्या व्यवसायांना बळ देण्याची गरज

  • भारतासारख्या देशाला असलेली रोजगाराची आवश्यकता आणि मनुष्यबळ पाहाता निलेकणी यांनी लघु आणि मध्यम व्यवसायांना चालना देण्यासाठी उपाय सुचवले आहेत.
  • आपल्याकडे एक व्यवसाय चालू करायचा म्हटलं तर १७ ठिकाणच्या परवानघ्या घ्याव्या लागतात. भविष्यात व्यवसायासाठीचे नियम सोपे असावेत. सहज कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात.
  • ‘ओएनडीसी’सारख्या (ONDC – Open Network for Digital Commerce) प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून छोट्या व्यावसायिकांना मोठ्या बाजारपेठा उपलब्ध करून देता येतील.
  • यासोबतच एआय टूल्सचा वापर केल्यास लाखो उद्योजकांना सक्षम करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत बनेल जगाची ‘एआय युझ केस कॅपिटल’

जगाच्या तुलनेत एआयच्या स्पर्धेत भारत खूप मागे असल्याचे बोलले जाते. निलेकणी म्हणाले, की पाश्चात्य देशांप्रमाणे केवळ एआय इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याच्या शर्यतीत न पडता, भारताने एआयच्या प्रत्यक्ष वापरावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ते म्हणाले, “ज्याप्रमाणे आपण डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर यशस्वी करून दाखवले, त्याचप्रमाणे शिक्षण, शेती आणि आरोग्यसेवा यांसारख्या क्षेत्रांत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एआयचा वापर व्हायला हवा. असे झाल्यास भारत जगाची ‘एआय युझ केस कॅपिटल’ बनेल.” एआय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मातृभाषेतून आणि ‘व्हॉइस इंटरफेस’द्वारे उपलब्ध करून देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

‘पोर्टेबल’ पीएफ आणि आरोग्य विमा

सध्याच्या काळात ‘गिग इकॉनॉमी’ आणि नोकऱ्या बदलण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, कामगारांची सामाजिक सुरक्षा ‘पोर्टेबल’ असावी, असं मत निलेकणी यांनी मांडले. “पेन्शन, पीएफ, विमा, बेरोजगारी भत्ता आणि आरोग्यसेवा यांसारखे फायदे एकाच कंपनीशी जोडलेले नसावेत. कामगाराने नोकरी बदलली तरी त्याचे हे फायदे आणि ‘डिजिटल क्रेडेन्शियल्स’ त्याच्यासोबत नव्या नोकरीतही हस्तांतरित व्हायला हवेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.