Narayana Murthy AI Job Impact: आयआयएम बेंगळुरू येथे मनीकंट्रोलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि एचडीएफसी बँकेचे माजी सीईओ आदित्य पुरी यांनी शाश्वत उद्योग उभारण्यासाठी आवश्यक गुण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील (AI) वेगान होत असलेल्या प्रगतीवर भाष्य केले. याचबरोबर त्यांनी एआयमुळे नोकरी गमावण्याची भीती का जास्त आहे हे स्पष्ट केले.
एआयमुळे भारतातील व्हाईट कॉलर नोकऱ्या नष्ट होतील की नाही याबद्दल बरीच चिंता आहे. विशेषतः आयटी सेवा उद्योगावर याचा काय परिणाम होईल याबाबत प्रश्न विचारल्यानंतर नारायण मूर्ती आणि आदित्य पुरी यांनी उत्तर दिले.
नारायण मूर्ती म्हणाले, “उत्पादकता वाढवण्यासाठी जनरेटिव्ह एआय वापरण्याच्या माझ्या स्वतःच्या अनुभवातून मला असे दिसून आले आहे की, एक हुशार व्यक्ती या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक चांगली गुणवत्ता आणि उच्च दर्जाची उत्पादकता मिळवू शकते. त्यामुळे तरुणांनी काळजी करण्याची गरज नाही. त्यांना फक्त या तंत्रज्ञानाचा वापर ‘साहाय्यक’ म्हणून करून त्यात कौशल्य मिळवण्याची गरज आहे. तसेच, स्मार्ट आणि कठोर परिश्रम, नवीन कल्पनांचे आकलन आणि शिस्तीच्या जोरावर हे तंत्रज्ञान स्वतःच्या फायद्यासाठी कसे वापरायचे, हे त्यांनी पटकन शिकले पाहिजे. म्हणूनच, जे हुशार आणि कष्टाळू आहेत, त्यांच्यासाठी जग संपणार नाही.”
या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य पुरी म्हणाले, “मला वाटते की एआय काय करू शकते आणि किती वेगाने करू शकते, याबाबत सध्या खूप अतिचर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे, किती नोकऱ्या जातील इत्यादींबाबतही नकारात्मकता प्रमाणाबाहेर वाढली आहे. काही नोकऱ्या कमी होतील का? तर हो. नवीन नोकऱ्या निर्माण होतील का? त्याचेही उत्तर हो असेच आहे. पण याचा अर्थ असा नाही की, जर तुम्ही म्हणालात की ६०% नोकऱ्यांची जागा एआय घेईल, तर ६०% नोकऱ्या जातील. असे काहीही घडत नाही. त्यामुळे एआयकडे पाहताना, आज जी काही अवाजवी चर्चा सुरू आहे ती थांबणे आवश्यक आहे.
“काही बदल नक्कीच होतील, पण नोकऱ्या जाण्याबाबतची ही नकारात्मकता खूपच टोकाची आहे. मानवी कामाची जागा पूर्णपणे एआय घेईल, असे होणार नाही. तुमच्याकडे ‘एजंट AI’ असेल, पण माणूस कुठेही जाणार नाही. हे दोन्ही मिळून काम करतील. आणि एआयबाबतच्या या सर्व गोष्टी उद्याच्या उद्या घडणार नाहीत, त्यासाठी एक-दोन दशकांचा काळ लागेल.”

