Naukri.com Founder Statement On AI Impact: जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेला (India: AI Impact Summit 2026) आज नवी दिल्लीत सुरुवात झाली आहे. यामध्ये एआयच्या नोकरीतील व्यत्ययापासून ते मुलांच्या सुरक्षिततेपर्यंतचे मोठे मुद्दे उपस्थित करण्यात येणार आहेत. या शिखर परिषदेचा उद्देश “जागतिक एआय प्रशासन आणि सहकार्यासाठी सामायिक दिशा” जाहीर करणे आहे.
या शिखर परिषदेत जागतिक तंत्रज्ञान कंपन्या, स्टार्टअप्स, शैक्षणिक आणि संशोधन संस्था, केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि आंतरराष्ट्रीय भागीदार एकत्र येणार आहेत.
या प्रदर्शनात १३ देश एआय व्यवस्थेतील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रदर्शन करतील. यामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, सर्बिया, एस्टोनिया, ताजिकिस्तान आणि आफ्रिकेतील देशांचा समावेश आहे.
नोकरी डॉट कॉमचे संस्थापक नेमके काय म्हणाले?
“एआयच्या युगात रोजगारक्षमतेचे भविष्य” या विषयावरील सत्रात बोलताना, अनेक उद्योगपतींनी असे मत व्यक्त केले की, सध्याच्या काही नोकऱ्या एआयमुळे अनावश्यक होऊ शकतात, परंतु एआयमुळे नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील. तसेच कर्मचाऱ्यांनाही त्यांना कोणते कौशल्य शिकावे लागेल याचा विचार करावा लागणार आहे.
यामुळे कोणीही त्यांची नोकरी गमावली नाही…
इन्फो एजचे संस्थापक (ज्यांच्या मालकीची नोकरी डॉट कॉम आहे) संजीव बिखचंदानी यांनी एआयमुळे नोकऱ्या गमावण्याच्या भीतीबाबत बोलताना बँकांमध्ये कामकाज हाताळण्यासाठी जेव्हा संगणक आणले गेले, त्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “यामुळे कोणीही त्यांची नोकरी गमावली नाही, त्याऐवजी उत्पादकता वाढली.”
एआयमुळे नोकऱ्या कमी होणार का?
एआयचा वापर वाढल्याने नोकऱ्या कमी होणार आहेत का, या प्रश्नाचे उत्तर देताना भिखचंदानी यांनी तरुणांना संदेश दिला की, “धोरणाची काळजी करू नका. एआयमुळे तुमची नोकरी जाऊ नये आणि त्याऐवजी तुम्हाला नोकरी मिळण्यास मदत होईल यासाठी तुम्ही काय करावे याचा विचार करा.”
तीन महिन्यांत तीन एआय…
“एआय प्रगत होत आहे, ते अथक आहे. जर तुम्ही एआय कसे वापरायचे हे शिकला नाही, तर एआय तुम्हाला धडा शिकवेल. पुढील तीन महिन्यांत तीन एआय प्लॅटफॉर्म कसे वापरायचे हे शिकण्याचे लक्ष्य ठेवा. तुम्ही जितके जास्त एआय शिकाल तितकी तुमची नोकरी अधिक सुरक्षित होईल”, असे ते म्हणाले.
