Netflix Reed Hastings Layoff Lesson: हॉलिवूडमधील एक प्रमुख कंपनी बनण्याच्या खूप आधी आणि सध्या ३१५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त बाजार भांडवल असलेली नेटफ्लिक्स कंपनी दोन दशकांपूर्वी स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी धडपडत होती. डॉट कॉमचा फुगा फुटल्यानंतर त्यावेळी डीव्हीडी भाड्याने देण्याचा व्यवसाय असणाऱ्या नेटफ्लिक्सला २००१ मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करावी लागली होती. नेटफ्लिक्सचे सह-संस्थापक रीड हेस्टिंग्ज यांना या कर्मचारी कपातीच्या घटनेने कंपनीबद्दल कसा विचार करावा याबद्दल एक धडा शिकवला आणि तो धडा म्हणजे, कंपनी एक घट्ट विणलेली टीम असू शकते, पण ती कुटुंब नाही.

हेस्टिंग्ज यांनी अलीकडेच एका मुलाखतीमध्ये सांगितले, “लोक उत्तम टीम्सचा आदर करतात, ते कुटुंबांचा आणि आम्ही ज्या पद्धतीने काम करतो त्याचा आदर करतात. पण जर तुम्ही कंपनीतीला कुटुंब म्हणत असाल, तर तुम्ही कधीही कर्मचारी कपात करू नये. तुम्ही तुमच्या मुलांना कधीही कामावरून काढू शकत नाही, बरोबर ना? मग जर तुम्ही म्हणालात की कंपनी एक कुटुंब आहे, पण ती कंपनी त्या पद्धतीने काम करत नसेल, तर लोक खूप संशयी बनतात.”

मात्र, हेस्टिंग्स यांचे असे मत आहे की, कर्मचाऱ्यांशी अतिशय जवळीक साधल्यास, कामगिरी खालावलेली असतानाही त्यांना आपण सुरक्षित आहोत असे वाटू लागते.

कंपनी म्हणजे कुटुंब या मानसिकतेला अनेकांचा विरोध

जेव्हा कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांबाबत कठीण निर्णय घ्यावे लागतात तेव्हा ‘कंपनी म्हणजे कुटुंब’ ही मानसिकता अडचणी निर्माण करू शकते, असे निष्कर्ष काढणारे हेस्टिंग्स हे काही एकमेव व्यक्ती नाहीत.

एअर बीएनबीचे सीईओ ब्रायन चेस्की यांनी कबूल केले आहे की, त्यांना हा धडा महामारीच्या काळात मिळाला. आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करताना, त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, “तुमच्या सर्वांबद्दल माझ्या मनात प्रेमाची भावना आहे.” मात्र, नंतर त्यांना जाणीव झाली की, अशा भाषेमुळे अस्पष्टता निर्माण झाली होती.

कामावरून काढून टाकणे अत्यंत कठीण होते

शॉपिफायचे सीईओ टोबी लुटके यांनीही असाच निष्कर्ष काढला. २०२१ मध्ये, त्यांनी व्यवस्थापकांना कंपनीचे वर्णन ‘कुटुंब’ म्हणून करण्याबाबत सावध केले होते. कारण असे केल्याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीसाठी जबाबदार धरणे कठीण होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे होते.

“ही कल्पनाच हास्यास्पद आहे. तुमचा जन्म एका कुटुंबात होतो. तुम्ही ते कधीच निवडत नाही आणि ते तुम्हाला कुटुंबातून बाहेर काढू शकत नाहीत. याचा धोका असा आहे की, यामुळे खराब कामगिरी करणाऱ्यांना कामावरून काढून टाकणे अत्यंत कठीण होते”, असे त्यांनी बिझनेस इनसाइडरने प्रकाशित केलेल्या एका पत्रात म्हटले होते.