Nvidia CEO Jensen Huang India AI: जगातील सर्वात श्रीमंत तंत्रज्ञान कंपनी एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांनी भारताला एआयचा वापर आणि या क्षेत्रातील विकास अधिक गतीने करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून भारताच्या विकासाल आधार देणाऱ्या आयटी क्षेत्राचा फायदा घेऊन देशांतर्गत एआय अर्थव्यवस्था उभारण्याची मोठी संधी आहे, असे ते म्हणाले. पत्रकारांशी बोलताना हुआंग म्हणाले की, एआय विकासाचा वेग पाहता देशांना या क्षेत्रात काम करण्यास वेळ घेणे परवडणारे नाही. “एआयचा विकास वेगाने होत आहे, त्यामुळे प्रत्येक देशाला त्याहूनही वेगाने यामध्ये काम करावे लागेल”, असे हुआंग यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले.
भारताचा पाया भक्कम
भारत हा जगातील एक प्रमुख आयटी हब आहे. एआयचा उदय म्हणजे एका नवीन तंत्रज्ञान-प्लॅटफॉर्मची सुरुवात आहे. त्यांच्या मते, भारतासाठी ही एक अशी संधी ठरू शकते ज्याद्वारे देशातील आयटी क्षेत्राने विकसित केलेले कौशल्य आणि पायाभूत सुविधांचा वापर करून एआयमध्ये अधिक विकास साधता येईल, असे हुआंग यांनी नमूद केले.
अर्थव्यवस्थेत एआयचा वापर
हुआंग म्हणाले की, एआयकडे आता केवळ एक नवे तंत्रज्ञान म्हणून पाहता कामा नये. आधुनिक अर्थव्यवस्था उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा तो अधिकाधिक भाग बनत आहे. त्यांनी अमेरिकेच्या दृष्टिकोनाकडे लक्ष वेधले, जिथे कंपन्या एआय टेक्नॉलॉजी स्टॅकवर काम करत आहेत.
ते म्हणाले की, अमेरिकेची इच्छा आहे की इतर जी-२० देशांनी एआयचा अवलंब करावा आणि त्याचा उपयोग करून स्वतःच्या एआय अर्थव्यवस्था विकसित कराव्यात.
एआय आणि पंतप्रधान मोदी
जेसन हुआंग यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या पूर्वीच्या भेटीचीही आठवण सांगितली. सुमारे दहा वर्षांपूर्वी आपण त्यांच्याशी एआयबाबत चर्चा केली होती, असे ते म्हणाले. आता, भारतीय कंपन्या आणि स्टार्टअप्स याचे रूपांतर प्रत्यक्ष व्यवसाय, उत्पादने आणि तंत्रज्ञानामध्ये कसे करतील हे पाहण्यास आपण उत्सुक असल्याचे हुआंग यांनी सांगितले.
एआयमध्ये एनव्हिडियाला एवढे महत्त्व का?
एनव्हिडियाची स्थापना १९९३ मध्ये झाली आणि ही कंपनी प्रामुख्याने कंप्युटर व गेमिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स’ (GPUs) साठी ओळखली जाऊ लागली. मात्र, एआयच्या उदयामुळे या कंपनीच्या भूमिकेत मोठा बदल झाला. प्रगत एआय प्रणालींना प्रशिक्षित करण्यासाठी आणि त्या कार्यान्वित करण्यासाठी लागणाऱ्या ‘कंप्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर’चा एनव्हिडियाचे चिप्स हा एक महत्त्वाचा भाग बनले. यामुळे जागतिक स्तरावर एआय क्षेत्रातील तेजीमध्ये एनव्हिडिया ही एक अत्यंत महत्त्वाची कंपनी म्हणून उदयास आली.
