OnePlus CEO Statement On India Operations: वनप्लसने, ते भारतात त्यांचे कामकाज बंद करत असल्याच्या वृत्तांचे खंडन केले असून, हे दावे खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. याचबरोबर भारतातील आपला व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचेही म्हटले आहे.

२१ जानेवारी रोजी एक्सवर जारी केलेल्या निवेदनात वनप्लस या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने म्हटले आहे की, “वनप्लस कंपनी बंद होत असल्याचा दावा करणाऱ्या अलीकडील बातम्या खोट्या आहेत. वनप्लस इंडियाचे व्यावसायिक कामकाज नेहमीप्रमाणे सुरू आहे. आम्ही सर्व संबंधितांना आवाहन करतो की, कोणताही निराधार दावा शेअर करण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून माहितीची पडताळणी करावी.”

याचबरोबर वनप्लस इंडियाचे सीईओ रॉबिन लियू यांनीही एक्सवरील एका पोस्टमध्ये या अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “वनप्लस इंडियाच्या कामकाजाबद्दल पसरलेल्या काही चुकीच्या माहितीवर मला स्पष्टीकरण द्यायचे होते. आमचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू आहे आणि ते असेच सुरू राहील.”

गेल्या वर्षभरात मागणीची वाढ मंदावत असताना आणि स्पर्धा तीव्र होत असताना, या क्षेत्रात विलीनीकरण, पुनर्रचना आणि ब्रँडच्या ध्येयांमध्ये बदलांविषयी वेळोवेळी अटकळ बांधली जात आहे.

वनप्लसची स्थापना २०१३ मध्ये एक स्वतंत्र स्मार्टफोन ब्रँड म्हणून झाली होती. परंतु पूर्वीच्या बीबीके इलेक्ट्रॉनिक्सच्या अंतर्गत सामायिक गुंतवणूकदार आणि पुरवठा साखळ्यांमुळे त्याचा ओप्पोशी दीर्घकाळापासून संबंध राहिला आहे. २०२१ मध्ये वनप्लसने वेगळा ब्रँड म्हणून कार्यरत राहूनही संशोधन, विकास आणि उत्पादन यासह आपल्या कामकाजाचे महत्त्वाचे पैलू ओप्पोमध्ये विलीन केले. तेव्हापासून वनप्लस चीन आणि भारतात ओप्पोचा एक भाग म्हणून प्रभावीपणे कार्यरत आहे.

आता रिअलमीच्या बाबतीतही असाच विलीनीकरणाचा कल दिसून येत आहे. २०१८ मध्ये ओप्पोमधून वेगळे होण्यापूर्वी रिअलमीची स्थापना ओप्पोकडूनच करण्यात आली होती. सध्या मंदावलेल्या व अत्यंत स्पर्धात्मक बाजारपेठेत स्मार्टफोन उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादन, खर्चातील कार्यक्षमता आणि पोर्टफोलिओवर अधिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याने, रिअलमी आपल्या पूर्वीच्या मूळ कंपनीसोबत आपले कामकाज अधिकाधिक जुळवून घेत आहे.

दुसरीकडे भारत जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक स्पर्धात्मक मोबाइल फोन बाजारांपैकी एक आहे. त्यामुळे भारतात स्मार्टफोन ब्रँड्सच्या धोरणांवर ग्राहकांच्या दृष्टीने कठोर सुरक्षा नियम लागू करत आहे.