Opendoor Layoffs : जागतिक आयटी आणि टेक क्षेत्रातून भारतीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध प्रॉपटेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘ओपनडोअर’ने भारतातून आपला गाशा कायमचा गुंडाळण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या धोरणामुळे सुमारे २५० भारतीय कर्मचाऱ्यांना एका झटक्यात आपली नोकरी गमवावी लागणार असून कंपनी आपले सर्व मुख्य ऑपरेशन्स भारतातून थेट अमेरिकेत हलवत आहे.
ओपनडोअर भारतातील संपूर्ण कामकाज थांबवणार
कंपनीचे सीईओ काझ नेजातियन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अधिकृत पत्रात म्हटले आहे की, “आम्ही काही महिन्यांपूर्वी जेव्हा ‘ओपनडोअर २.०’ धोरण जाहीर केले, तेव्हा भारतात आमचे २५० कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी काही पदे आधीच अमेरिकेत स्थलांतरित करण्यात आली आहेत. आता या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आम्ही भारतातील संपूर्ण कामकाज अधिकृतपणे थांबवत.”
एआय ठरले नोकरी कपातीचे कारण!
२०१४ मध्ये स्थापन झालेली ‘ओपनडोअर’ ही कंपनी ‘आय-बाइंग’ मॉडेलवर काम करते. यामध्ये डेटा ॲनालिटिक्स आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून घरांच्या किमती ठरवल्या जातात आणि थेट घरमालकांकडून ती खरेदी करून पुन्हा विकली जातात. सीईओ नेजातियन यांनी सांगितले, की पूर्वी कंपनीतील अनेक गुंतागुंतीची कामे करण्यासाठी भारतातील मोठ्या मनुष्यबळावर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, आता कंपनीची सर्व सिस्टीम एकमेकांशी जोडली गेली असून ती ‘एआय सक्षम’ झाली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे मनुष्यबळाची गरज कमी झाली आहे. उर्वरित कामे अमेरिकेतील लहान टीम्सद्वारे सहज हाताळली जाऊ शकतात. यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
धोरणात्मक बदलामुळे नोकरकपात
कंपनीने या परिपत्रकात म्हटलं, की, ही कपात कर्मचाऱ्यांच्या खराब कामगिरीमुळे झालेली नाही. “भारतातील आमचे सहकारी अत्यंत हुशार आणि कार्यक्षम आहेत. हा निर्णय केवळ आमच्या अंतर्गत पुनर्रचनेचा भाग आहे. नोकरी गमावणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना नुकसाई भरपाई, नवीन नोकरी शोधण्यासाठी साहाय्य आणि इतर आवश्यक सहकार्य दिले जाणार आहे. तसेच, कामाचे स्थलांतर सुरळीत पूर्ण होईपर्यंत काही कर्मचारी तात्पुरते कार्यरत राहतील.
सॅम ऑल्टमन आणि सॉफ्टबँकची मोठी गुंतवणूक
ओपनडोअर ही प्रॉपटेक क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित कंपनी मानली जाते. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन, खोसला व्हेंचर्स, जनरल अटलांटिक, अँड्रीसन होरोविट्झ आणि सॉफ्टबँक व्हिजन फंड यांसारख्या जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांनी या कंपनीत भांडवल गुंतवले आहे. २०२० मध्ये ही कंपनी ‘स्पॅक’ विलीनीकरणाच्या माध्यमातून अमेरिकन शेअर बाजारात सुचिबद्ध झाली होती.
तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरकपातीची लाट
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरू आहे. या वर्षीच्या सुरुवातीपासून जागतिक स्तरावर आतापर्यंत १,००००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. कंपन्या मनुष्यबळ कमी करत असून एआयचा वापर वाढवण्यावर भर देत आहेत. यात गुगल, मेटा, टीसीएस सारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे.
