Oracle Layoffs India Details: एआयमुळे नोकऱ्या जातील यामुळे चिंतेत असणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील (IT) कर्मचाऱ्यांच्या चिंतेत आणखी भर टाकणारी बातमी समोर आली आहे. जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘ओरॅकल’ खर्च कमी करण्याच्या उद्देशाने कर्मचारी कपातीची आणखी एक फेरी राबवण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर यामुळे हजारो भारतीय कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात.
ओरॅकल भारतात सुमारे ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. बाजार संशोधन संस्था ‘EIIRTrend’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी परीख जैन यांच्या मते, ही कपात १ सप्टेंबरपासून लागू होण्याची अपेक्षा आहे. याबाबत इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे.
ही संभाव्य नोकर कपात कंपनीतील एखाद्या विशिष्ट विभागापुरती मर्यादित नसून याचा परिणाम सर्व विभागातील कर्मचाऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. विविध विभागांना त्यांचे एकूण बजेट कमी करण्यास सांगण्यात आले असून, त्यामुळे अनेक विभागांमधील नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची जागतिक कंपनी असलेल्या ओरॅकलचे भारतात सुमारे ३०,००० कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रस्तावित कपातीमुळे देशातील त्यांच्या कर्मचारीसंख्येत मोठी घट होऊ शकते. याआधीही ओरॅकलच्या भारतातील सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारच्या कपातीचा फटका बसला होता.
ओरॅकल, १ सप्टेंबर म्हणजेच आतपासून ही नोकरकपात करणार असल्याचे अनेक वृत्तांमध्ये म्हटले असले तरी, कंपनीने आजपासून कर्मचारी कपात सुरू होणार असल्याच्या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.
ओरॅकलच्या कर्मचाऱ्यांसाठी १ सप्टेंबर ही तारीख का महत्त्वाची?
१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संभाव्य नोकरकपातीबाबतचे वृत्त सर्वात आधी ऑगस्टमध्ये ‘बिझनेस इनसाइडर’ने दिले होते. यासाठी त्यांनी ओरॅकलच्या नोकरकपात योजनांची माहिती असलेल्या व्यक्तींचा आणि त्यांनी पाहिलेल्या एका अंतर्गत कागदपत्राचा संदर्भ दिला होता.
त्या वृत्तानुसार, ओरॅकलने व्यवस्थापकांना अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यास सांगितले होते, ज्यांच्यावर नोकरकपातीचा परिणाम होऊ शकतो. या योजनांची थेट माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, १ सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये आणि त्यावरील वेतनाच्या खर्चात कपात करण्याची ओरॅकलची योजना होती. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, कर्मचाऱ्यांना आजच (१ सप्टेंबर २०२६) कपातीबाबतच्या सूचना मिळू शकतात.
ओरॅकल
ओरॅकल ही टेक्सास राज्यातील ऑस्टिन येथे मुख्यालय असलेली एक अमेरिकन एंटरप्राइझ टेक्नॉलॉजी कंपनी आहे. ही कंपनी जगभरातील विविध कंपन्या आणि सरकारांना सॉफ्टवेअर, क्लाउड कंप्युटिंग सेवा आणि हार्डवेअर विकते. ही कंपनी तिच्या रिलेशनल डेटाबेस सॉफ्टवेअरसाठी सर्वाधिक ओळखली जाते.
