Telegram founder charged with aiding terrorism: रशियाने टेलिग्रामचे संस्थापक पावेल डुरोव्ह यांच्यावर नुकतेच “दहशतवादाला मदत केल्याचा” आरोप करत त्यांच्या नावाचा आंतरराष्ट्रीय ‘वॉन्टेड’ यादीत समावेश केला आहे. रशियन अधिकारी टेलिग्रामवर निर्बंध लादत असतानाच डुरोव्ह यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. हे पाऊल इंटरनेटवर रशियाचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या दीर्घकालीन प्रयत्नांचा एक भाग आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर या प्रयत्नांना अधिकच वेग आला आहे.

असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, रशियाची प्रमुख देशांतर्गत सुरक्षा संस्था असलेल्या ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’ने असा आरोप केला आहे की, टेलिग्रामने असे अनेक चॅनेल्स, चॅट्स आणि बॉट्स हटवण्यात अपयशी ठरले आहे, ज्यांचा वापर युक्रेनच्या गुप्तचर संस्था आणि दहशतवादी संघटनांकडून रशियामध्ये घातपात, दहशतवाद आणि सायबर-फसवणुकीच्या कारवायांचे नियोजन व समन्वय साधण्यासाठी केला जात आहे.

संबंधित यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२५ पासून रशियामध्ये या चॅटबॉटचा वापर करणाऱ्या १२ ते २२ वयोगटातील ४६ जणांना सरकारी अधिकाऱ्यांवरील हल्ले, जाळपोळ आणि इतर गुन्ह्यांच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे.

ड्युरोव्ह यांनी या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर केले होते की, रशियन अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध फौजदारी तपास सुरू केला आहे. तसेच, ‘गोपनीयतेचा अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याच्या’ प्रयत्नांचाच एक भाग म्हणून टेलिग्रामवचा वापर कमी व्हावा यासाठी हे अधिकारी खोटे कारण पुढे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

दोषी आढळल्यास, पावेल डुरोव्ह यांना रशियामध्ये जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तात कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाचा संदर्भ देण्यात आला आहे. ही कंपनी दुबईस्थित आहे आणि फ्रान्स व संयुक्त अरब अमिरातीचे दुहेरी नागरिकत्व असलेले ड्युरोव्ह तिथेच वास्तव्यास आहेत.

पावेल डुरोव्ह कोण आहेत?

पावेल डुरोव्ह यांचा जन्म सोविएत युनियनमध्ये झाला होता. त्यांनी रशियातील सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी ‘VKontakte’ नावाच्या सोशल मीडिया ॲपची स्थपना केली. हे ॲप देशात लोकप्रिय झाले. ‘टाइम’ मॅगझिनच्या प्रोफाइलनुसार, दुरोव्ह यांना रशियन सरकारकडून युजर्स डेटा आणि सेन्सर सामग्री शेअर करण्यासाठी वाढत्या दबावाचा सामना करावा लागला. त्यानंतर ते रशिया सोडून गेले. १४ ऑगस्ट २०१३ रोजी पावेल आणि त्यांच्या भावाने टेलीग्रामची स्थापना केली. २०२४ च्या सुरुवातीला ९०० दशलक्ष युजर्ससह टेलीग्राम ॲप जागतिक स्तरावर सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया ॲप्सपैकी एक ठरले आहे. या ॲपच्या यशामुळे डुरोव्ह यांचे नाव अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहे.